सिन्नर : लॉकडाउन असतानाही विनापरवाना गावात येऊन होम क्वॉरण्टाइनचे नियम न पाळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे लेखी आदेश विभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी ग्रामपंचायतींना काढले आहेत.निफाड उपविभागातील निफाड आणि सिन्नर या दोन तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी पठारे त्यांनी कडक पावले उचलली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे व परिसर, पिंपरी- चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद व इतर कोरोनाबाधित परिसरातून कोणीही व्यक्ती विनापरवानगी गावात येणार नाही यासाठी प्रयत्न करा. विनापरवानगी आल्याचे आढळून आल्यास त्याला गावात वास्तव्य करू न देता ज्या ठिकाणाहून आला आहे, तेथे परत पाठवा. तसेच अशा व्यक्तींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करा. अशा प्रकारे काही व्यक्ती यापूर्वी आलेल्या असल्यास त्यांच्या घरी भेट देऊन ग्रामसेवक, तलाठी यांनी व्यक्तीश: संबंधित व्यक्तीची त्याच्या घरी स्वतंत्र होम क्वॉरण्टाइनची व्यवस्था आहे किंवा नाही याबाबतची खात्री करावी. गावातील कुणालाही कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेला अवगत करावे, कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कंपन्या, उद्योग, व्यवसाय, दुकानांची तलाठी व ग्रामसेवकांनी नियमित पाहणी करावी, बाहेरगावी भाजीपाला वाहतूक करणाºया व्यक्तीने, वाहनचालकाने रोज आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच त्याने प्रवास करून आल्यानंतर घरातच थांबणे बंधनकारक आहे. त्याच्या वाहनाचे रोज निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे.----ग्रामस्तरीय समितीवर जबाबदारीकोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, तलाठी, आरोग्यसेवक, पोलीसपाटील आणि ग्रामसेवक या समितीचे सदस्य असतील. या समितीने कोरोना उपाययोजनांची सुयोग्य अंमलबजावणी करावी व कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही यासाठी आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे.
क्वॉरण्टाइनचे नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:44 IST