सख्ख्या भावांमध्ये रंगतेय लढत
By Admin | Updated: May 15, 2017 00:31 IST2017-05-15T00:31:26+5:302017-05-15T00:31:40+5:30
हाडाच्या राजकारणापायी सख्खे भाऊ निवडणूक रिंगणात उतरून एकमेकांची जिरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रत्यय मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येत आहे.

सख्ख्या भावांमध्ये रंगतेय लढत
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो व कोणी कोणाचा शत्रू नसतो याचा प्रत्यय कमी अधिक प्रमाणात राजकारण्यांना येत असतो; मात्र हाडाच्या राजकारणापायी सख्खे भाऊ निवडणूक रिंगणात उतरून एकमेकांची जिरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रत्यय मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येत आहे. माजी महापौर दिवंगत निहाल अहमद व विद्यमान उपमहापौर युनुस ईसा यांचे सुपुत्र आमने-सामने लढत आहेत.
महापालिकेच्या रणांगणात सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात राजकीय घराणेही अपवाद राहिले नाही. महापालिकेतील संख्याबळ वाढविण्यासाठी एकाच कुटुंबातील व नातेवाइकांनी पक्षाची अधिकृतरीत्या उमेदवारी बहाल करण्याची किमयाही पक्षश्रेष्ठींनी दाखवून दिली आहे. नाते-गोते बघून उमेदवारी देण्यात आली आहे.
राजकारणात प्रत्येकाला हितशत्रू असतात; मात्र सत्तेसाठी सख्ख्या भावांमध्येच लढत होणार आहे. मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२च्या (ड) अ जागेसाठी माजी दिवंगत मंत्री निहाल अहमद यांचे पुत्र नगरसेवक बुलंद एकबाल हे जनता दलाकडून उमेदवारी करीत आहेत. तर त्यांच्यासमोर त्यांचेच बंधू अन्सारी इश्तियाक अहमद निहाल अहमद हे समाजवादी पार्टीकडून उभे आहेत. महापालिकेच्या राजकारणात कायम दबदबा असलेले व ज्येष्ठ नगरसेवक विद्यमान उपमहापौर युनुस ईसा यांचे पुत्र शेख माजीद मो. युनुस हे एमआयएमकडून उमेदवारी करीत आहेत. तर त्यांना त्यांचे बंधू शेख खालीद परवेझ मो. युनुस यांनी अपक्ष उमेदवारी करून आव्हान उभे केले आहे. या सख्ख्या भावांमध्ये होणाऱ्या लढतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
राजकारणाचा मोठा वारसा लाभलेल्या या कुटुंबामध्ये सत्तेसाठी आता घरातच संघर्ष सुरू झाला आहे. दीर्घकाळ सत्तेची सूत्रे असूनही सत्तेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महापालिकेच्या राजकारणात कमी-अधिक प्रमाणात अशा घटना घडल्या असल्या तरी यंदाच्या निवडणुकीत चारही तरुण उमेदवार समोरासमोर लढत देत आहेत.