सटाण्यात दरोडेखोरांचा गोळीबार

By admin | Published: December 13, 2015 12:01 AM2015-12-13T00:01:06+5:302015-12-13T00:05:36+5:30

सटाण्यात दरोडेखोरांचा गोळीबार

Fighter shotgun in the neighborhood | सटाण्यात दरोडेखोरांचा गोळीबार

सटाण्यात दरोडेखोरांचा गोळीबार

Next

एक जखमी : दरोड्याचा प्रयत्न फसलासटाणा : शहरातील शिवाजीरोडवरील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात किरण तुळशीराम सोनवणे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जखमीला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (पान ७ वर)


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी रोडवरील सुनील अहिरराव यांच्या मालकीचे अहिरराव ज्वेलर्स शोरूम आहे. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका सिल्व्हर रंगाच्या स्कार्पिओवर आलेल्या चार दरोडेखोरांनी टॉमीच्या साहाय्याने शोरूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दागिने आणि ठेवलेल्या रोकडची दरोडेखोर शोधाशोध करत असताना कस्तुरी तुळस इमारतीचे मालक किरण सोनवणे यांना जाग आली. ते हातात काठी घेऊन दुकानाजवळ आले असता त्यांना दरोडेखोर दुकानात शिरल्याचे आढळून आले. त्यांनी आरडाओरडा करून काठीने दरोडेखोरांच्या स्कार्पिओच्या मागील बाजूच्या काचा फोडल्या दरोडेखोरांना मज्जाव करून एका दरोडेखोराला पकडून प्रतिकार केला; मात्र गाडीत बसलेल्या एका दरोडेखोराने सोनवणे यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी सोनवणे यांच्या पोटात घुसली तर दुसरी गोळी कमरेला चाटून गेली.सोनवणे गंभीर जखमी झाल्यानंतर आपली सुटका करून दरोडेखोर मालेगावच्या दिशेने पळून जाण्यात सफल झाले. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या सोनवणे यांच्यावर शहरातीलच डॉ. व्ही. के. येवलकर यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना तत्काळ मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रि या करून पोटातील एक गोळी काढण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान घटनेनंतर काही मिनिटातच पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बिनतारी संदेश दिल्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. घटनास्थळी मालेगावचे अपर अधीक्षक सुनील कडासने,उपअधीक्षक अशोक नखाते यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर ठसे तज्ज्ञांना पाचारण करून ठसे घेण्यात आले. दरोडेखोरांच्या तपासासाठी दहा जणांचे पथक रवाना केले असल्याचे पोलीस उपअधीक्षक नखाते यांनी सांगितले.
सशस्त्र दरोड्याची तिसरी घटना
शहरात या घटनेपूर्वी १९८७ मध्ये मालेगाव रोडवरील रौदळ वस्तीवर सुमारे वीस ते पंचवीस दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. या दरोड्यात दरोडेखोरांनी एका महिलेची हत्त्या केली होती, तर आठ जणांना कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले होते. १९९० मध्ये भाक्षी रोडवरील प्रतिष्ठित व्यापारी धांडे यांच्या निवासस्थानावर दहा ते बारा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात पाच जणांवर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर ही गोळीबार करण्याची तिसरी घटना.

Web Title: Fighter shotgun in the neighborhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.