इमारतीमध्ये व्यावसायिकावर गोळीबार धात्रक फाटा
By Admin | Updated: October 9, 2015 01:00 IST2015-10-09T01:00:17+5:302015-10-09T01:00:39+5:30
घटना स्थळावरून जिवंत काडतूस सापडले

इमारतीमध्ये व्यावसायिकावर गोळीबार धात्रक फाटा
पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा परिसरातील योगेश्वर अपार्टमेंटमधील रहिवासी व्यावसायिकावर इमारतीच्या वाहनतळामध्येच गोळीबार करण्यात आल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धात्रक फ ाटा येथील जोंधळे कृषी उद्योग या बी-बियाणे विक्रीच्या दुकानाचे संचालक नीलेश जोंधळे, (३९, रा.योगेश्वर अपार्टमेंट) हे दुकान बंद करून रात्री दहा वाजेच्या सुमारास घरी निघाले. राहत्या सोसायटीच्या वाहनतळात चारचाकीने नीलेश चालकासमवेत पोहचले. यावेळी चालक मोटार उभी करत असताना नीलेश मोटारीतून उतरून सदनिकेत जाण्यासाठी निघाले असता त्यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याने ते जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला गोळी लागली असून, ते गंभीर जखमी झाले आहे. गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये एकच धडकी भरली. बहुतांश रहिवाशी तत्काळ घराबाहेर आले. यावेळी नीलेश यांची पत्नीही इमारतीच्या वाहनतळामध्ये पोहचली असता नीलेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. रहिवाशांनी तत्काळ वाहनातून नीलेश यांना जवळच्या खासगी रुग्णालयात हलविले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, एन.अंबिका, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्यासह आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गोळीबार करणाऱ्यांचा कुठलाही मागमूस पोलिसांना लागला नसून मारेकऱ्यांच्या शोधासाठी संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच गुन्हे शाखेचे विशेष पथकही रवाना करण्यात आले आहे. आयुक्तालयस्तरावरून सर्व पोलीस ठाण्यांना गोळीबार करणाऱ्यांच्या शोधासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नीलेश यांच्यावर गोळीबार करणारे दोघे जण होते, अशी माहिती त्यांच्या चालकाने दिल्याचे सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी सांगितले.