क्षीण कॉँग्रेसचा अस्तित्वासाठी लढा

By Admin | Updated: February 26, 2017 00:18 IST2017-02-26T00:18:06+5:302017-02-26T00:18:21+5:30

क्षीण कॉँग्रेसचा अस्तित्वासाठी लढा

The fight for the existence of a weak Congress | क्षीण कॉँग्रेसचा अस्तित्वासाठी लढा

क्षीण कॉँग्रेसचा अस्तित्वासाठी लढा

नाशिक : सत्तेअभावी क्षीण झालेल्या कॉँग्रेसला तशी महापालिकेत संजीवनीची अपेक्षा नव्हती, परंतु ती मिळावी, असे प्रयत्नही झाले नाहीत. स्थानिक पातळीवर तसे प्रयत्न झाले नाहीत आणि नेत्यांनीही लक्ष दिले नाहीत. प्राप्त परिस्थितीत राष्ट्रवादीशी आघाडी करून जे काही यश मिळवले ‘तेही नसे थोडके’ या उक्तीत बसणारे ठरले आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तांतरानंतर नाशिकची कॉँग्रेस अधिकच कमकुवत असल्याचे जाणवत आहे. त्यातच स्थानिक गटबाजी आणि मोजक्या जागांसाठी आग्रह तसेच बंडखोरीचे इशारे देणे हेदेखील आश्चर्यकारक होते. मुळातच पक्षाचा कारभार हाकणे कठीण असताना गेल्याच वर्षी नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जान फुंकण्याचा प्रयत्न केला. भाजपा सरकारच्या प्रत्येक मुद्द्यावर आंदोलन करण्याची सूचना करतानाच स्थानिक कॉँग्रेसने सांगितले तर पक्षाचे नेते राहुल गांधी यांंची जाहीर सभा घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यानंतरही स्थानिक कॉँग्रेसमध्ये ऊर्जा आलीच नाही. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीशी आघाडी करण्याच्या तयारीला मक्षिकापात झाला. आघाडीची प्राथमिक बैठक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता झालेला निर्णय म्हणून शहराध्यक्ष शरद अहेरांवरच अविश्वास आला. समांतर कॉँग्रेसच्या निष्ठावंतांची बैठका घेण्यात आला.  अडचणीच्या परिस्थितीत शहराध्यक्षांची भूमिका जुन्या- जाणत्यांना बरोबर घेऊन चालण्याची नसल्याचे आरोप झाले आणि गुजरातमधून आलेल्या एक पक्ष निरीक्षकासमोरच आपसातील संघर्ष चव्हाट्यावर आला आणि अन्य अनेक प्रकारांनी पक्ष जेरीस आला असतानाही पक्षाच्या हिताचा कोणी विचार केला नाही. उलट ज्याने त्याने आपल्या सोयीने पक्षाला वाकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रीय पातळीवरून मनसेशी आघाडी करू नका, असा सांगावा आला असतानाही तशा तडजोडी स्थानिक पातळीवर कराण्यात आल्या आणि मनसेचे झेंडे घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.  अर्थात, त्यातील काही गोष्टीच पक्षाला तारक ठरल्या, हा एकमेव भाग सोडला तरी ज्यांनी पक्षाला मोठे केले अशांनीही पक्षाची उमेदवारी म्हणजे पराभव अशी भूमिका घेत अधिकृत उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढत घेतली. पक्षाचे अनेक माजी आमदार तसेच अनेक मान्यवरांनी पराभवाचे धनी कशाला व्हायचे, अशी भूमिका घेत निवडणुकीत सक्रिय न होण्याची भूमिका घेतली तर काहींनी अन्य पक्षांत सहभागी होण्याची भूमिका घेतली.  पक्षाच्या स्थानिक स्तरावर अशी अवस्था असताना नेत्यांनीही लक्ष पुरवले नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी लावलेली हजेरी आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा वगळता एकंदरच कॉँग्रेसने विरोधकांना बाय दिल्याचीच स्थिती राजकीय पटलावर होती. त्यातून जे काही निष्पन्न झाले. ते म्हणजे जेमतेम सहा जागांवरील यश! त्यातही स्थानिक उमेदवारांचेच हे यश ठरले. बाकी निवडणुकीत उमेदवारी दिल्यानंतरही तीन जणांनी माघार घेतली. यातूनच पक्षाची बिकट अवस्था लक्षात यावी.  यशाचे अनेक धनी असतात आणि अपयशाला कोणीच वाली नसतो, अशीच एकंदर कॉँग्रेसची अवस्था होती. एकेकाळी महापालिकेत नऊ वर्षे सत्ता गाजवणाऱ्या या पक्षाची अशी अवस्था जुन्या कॉँग्रेसींना उद्विग्न करणारी ठरली. (प्रतिनिधी)

Web Title: The fight for the existence of a weak Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.