चोरीच्या पन्नास सायकली जप्त
By Admin | Updated: May 4, 2016 00:27 IST2016-05-04T00:10:12+5:302016-05-04T00:27:44+5:30
पोलीस कारवाई : विधीसंघर्षित बालक ताब्यात

चोरीच्या पन्नास सायकली जप्त
पंचवटी : परिसरातील क्लास तसेच इमारतीच्या आवारात उभ्या केलेल्या सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी पोलिसांनी पेठरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टीत राहणाऱ्या चौघा विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी या चौघा बालकांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागांतून या सायकल चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पेठरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरातील काही बालक सायकल चोरी करत असल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे शनिवारी पहाटेच वज्रेश्वरी झोपडपट्टीत गुन्हा शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय गवांदे, सचिन म्हसदे, सतीश वसावे, दशरथ निंबाळकर, कट्यारे आदिंसह कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एका बालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरी करणाऱ्या चौघा विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून अंदाजे एक लाख रुपये किंमत असलेल्या पन्नास सायकली जप्त केल्या आहेत. (वार्ताहर)