शिवाजीनगरमध्ये फोफावली गुन्हेगारी
By Admin | Updated: November 4, 2015 23:23 IST2015-11-04T23:21:39+5:302015-11-04T23:23:41+5:30
आयुक्तांना निवेदन : नागरिकांमध्ये दहशत, कारवाईची मागणी

शिवाजीनगरमध्ये फोफावली गुन्हेगारी
नाशिक : काही दिवसांपासून सातपूरमधील शिवाजीनगर, श्रमिकनगर भागात गुन्हेगारी फोफावली असून, दिवसाढवळ्या या भागात हाणामाऱ्या, लूटमार तसेच महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, या गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीचे निवेदन नगरसेवक दिनकर पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले.
शहरात दर दोन दिवसाला खुनाची घटना उघडकीस येत आहे. त्यात सातपूरमधील शिवाजीनगर, श्रमिकनगर हा परिसरदेखील आघाडीवर असून, रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणे सर्वसामान्यांना अवघड होत आहे. सध्या सणासुदीच्या दिवसात तर या टोळक्यांना चांगलाच ऊत आला असून, चौकाचौकांमध्ये तरुणी, तसेच महिलांच्या छेड काढण्याचे प्रकार सर्रासपणे त्यांच्याकडून घडत आहेत. शिवाजीनगर, श्रमिकनगर हा परिसर प्रामुख्याने कामगारांची वसाहत म्हणून ओळखला जात असल्याने आठवड्याच्या दर शनिवारी या भागात कामगारांच्या लुटीच्या घटना उघडकीस येतात.
याबाबत वेळोवेळी सातपूर तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या गेल्या; मात्र पोलिसांना या सर्व प्रकाराचे गांभीर्य नसल्याने या भागातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
दरम्यान, कठोर उपाययोजना करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी अमोल पाटील, ब्रिजेश यादव, धर्मेंद्र सिंग, नन्हेलाल यादव, राकेश सिंग, सुरेश यादव, राम चौहान आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)