रहिवाशांमध्ये तीव्र संताप

By Admin | Updated: July 31, 2016 00:54 IST2016-07-31T00:51:46+5:302016-07-31T00:54:26+5:30

पवारवाडी, गुलाबवाडीतून बंदी असूनही अवजड वाहतूक सुरूच

Fierce resentment among residents | रहिवाशांमध्ये तीव्र संताप

रहिवाशांमध्ये तीव्र संताप

 नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील पवारवाडी येथे अवजड वाहनाखाली सापडून एका तीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पवारवाडी आणि गुलाबवाडीतील नागरिक सुन्न झाले आहेत. अत्यंत विदारक आणि भयानक अशा या अपघाताच्या घटनेमुळे रहिवासी क्षेत्रातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. विशेष म्हणजे रहिवासी क्षेत्रातून अवजड वाहनांना बंदी असतानाही राजकीय वरदहस्त आणि ट्रान्सपोर्ट मालकांच्या मनमानी कारभारामुळे भर वस्तीतून अवजड वाहतूक सुरू आहे. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ गेली कित्येक वर्षे सुरू आहे. आता मात्र नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला असून, शुक्रवारच्या घटनेनंतर रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. रहिवासी क्षेत्रातील अवजड वाहतूक बंद न झाल्यास कायदा हातात घेण्याची भाषा येथील नागरिक करू लागले आहेत.
गुलाबवाडी, पवारवाडी आणि राजवाडा येथून रेल्वे मालधक्क्याची अवजड वाहतूक सातत्याने सुरू असते. नागरिकांच्या अगदी घराजवळून अवजड वाहने जात असल्याने नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही जिकरीचे वाटू लागले आहे. या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता नागरिक जीवन-मृत्यूशी रोजच झगडत असल्याचे चित्र समोर येते. जियाउद्दीन डेपो येथे अवजड वाहनांसाठी असलेला वजनकाटा त्वरित हलवावा, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. या परिसरात आतापर्यंत मालट्रकने आठ ते दहा जणांचा बळी घेतला आहे. एकट्या पवारवाडी परिसरात सहा वर्षांत सात जणांचा बळी गेला आहे. रेल्वे मालधक्का मार्गावर झालेल्या अनेक अपघातांमध्ये काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. कित्येक निष्पाप बळी गेले आहेत. मात्र पैशाच्या जोरावर येथील ट्रान्सपोर्ट मालकांकडून प्रकरणावर पडदा पाडला जात असल्याने येथील वाहतूक बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप परिसरातील संतप्त नागरिक करीत आहे. या घटनेनंतर तरी आता प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fierce resentment among residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.