प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधींना मारहाण; दोघांना अटक
By Admin | Updated: November 28, 2014 22:49 IST2014-11-28T22:49:09+5:302014-11-28T22:49:21+5:30
पोलीस कोठडी : सात जणांवर गुन्हा दाखल

प्रसिद्धीमाध्यम प्रतिनिधींना मारहाण; दोघांना अटक
नाशिक : रस्ता ओलांडत असताना अंगावर आलेल्या रिक्षाचालकास जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर प्रसिद्धीमाध्यमाच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी घडला होता. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई नाका परिसरातील हॉटेल संदीप येथे सागर वैद्य व किरण कटारे हे रस्ता पार करत असताना,
अचानक त्यांच्या अंगावर एक रिक्षा आली़ त्यांनी याबाबत रिक्षाचालकास जाब विचारला असता रिक्षाचालक वसंत बंदरे व त्यांच्या सहा साथीदारांनी या दोघांना लाकडी दांडका व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. यावेळी तेथे उपस्थित असलेले मारहाणीस विरोध करणारे आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी हेमंत बागुल यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट (तीन तोळे) संशयितांनी ओढून नेले. याप्रकरणी किरण कटारे यांनी रिक्षाचालक व त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.
सरकारवाडा पोलिसांनी या मारहाण प्रकरणी संशयित वसंत बापू बंदरे (वडाळागाव) व त्यांचा मुलगा विशाल बंदरे या दोघांना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. या दोघांनाही ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)