कॉलेजरोडवरील बेकरीला भीषण आग
By Admin | Updated: July 26, 2016 00:44 IST2016-07-26T00:43:54+5:302016-07-26T00:44:07+5:30
मध्यरात्रीची घटना : सिलिंडरच्या स्फोटाने हादरला परिसर

कॉलेजरोडवरील बेकरीला भीषण आग
नाशिक : सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कॉलेजरोडवरील बंगळुरू अय्यंगार बेकरीला अचानक आग लागली. आगीने अल्पावधीतच रुद्रावतार धारण केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सिलिंडरचा स्फोट झाल्याने कॉलेजरोड हादरला.
याबाबत अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कॉलेज रोडवरील आसावरी व्यापारी संकुलातील राजेंद्र शेलार यांच्या अय्यंगार बेकरीने मध्यरात्री अचानक पेट घेतला. कॉलेज रोडवरून याबाबत ‘कॉल’ येताच मुख्यालयातून पहिला बंब अवघ्या पाच मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचला. आगीचा रुद्रावतार व बेकरीपासून जवळच असलेले पेंटचे दुकान यामुळे लिडिंग फायरमन इकबाल शेख यांनी तत्काळ दुसरा बंबही मुख्यालयातून बोलाविला. कॉलेज रोडवरून समोरील बाजूने आग विझविण्याचे कार्य जवान करत असताना मागील बाजूने बेकरीमधील एका सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. रहिवासी झोपेतून जागे झाले आणि घरांबाहेर पडले. बेकरीलाच लागून असलेल्या वृषाली बुक स्टॉल अॅन्ड स्टेशनरी दुकानाच्या सामाईक भिंतीला या स्फोटाने भगदाड पडले. आगीच्या ज्वाला पुस्तक विक्रीच्या दुकानामध्ये पोहचल्याने पुस्तके बेचिराख झाली. तसेच दोन झेरॉक्स यंत्रांचेही नुकसान झाले. वह्या-पुस्तके, स्टेशनरी, फर्निचर जळाल्याने सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज राजेंद्र भामरे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)