मातब्बरांची ‘सौभाग्यवतीं’साठी ‘फिल्डिंग’
By Admin | Updated: January 14, 2017 00:14 IST2017-01-14T00:14:04+5:302017-01-14T00:14:15+5:30
नायगाव : गट महिला राखीव, गणात इच्छुक वाढले; सभापतिपदाच्या आरक्षणामुळे माळेगाव गणाची चलती

मातब्बरांची ‘सौभाग्यवतीं’साठी ‘फिल्डिंग’
दत्ता दिघोळे नायगाव
माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण जिल्हाभर ओळखला जाणारा नायगाव गट आगामी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महिला राखीव झाल्याने पुन्हा एकदा मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवणारा ठरला आहे. गेल्या निवडणुकीत नायगाव गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होता व होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ओबीसी महिला राखीव आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयात प्रवेश करण्याची मातब्बरांची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार नाही. त्यामुळे अनेकांनी गटाऐवजी गणाला पसंती दिली, तर काही मातब्बरांनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
२००७ची निवडणूकवगळता आजपर्यंत नायगाव गटात दिघोळे यांचे वर्चस्व राहिले आहे. गटात आजपर्यंत लहान-मोठ्या सर्वच निवडणुका दिघोळेविरुद्ध कोकाटे गट अशाच झाल्या आहेत. त्यात दिघोळे यांचे वर्चस्व कायम राहिले असले तरी गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणांमुळे त्यांचे फिरणे कमी झाल्याने परिसरासह संपूर्ण गटात माणिकराव कोकाटे, आमदार राजाभाऊ वाजे व पंचायत समिती सदस्य उदय सांगळे यांच्याभोवती गटाचे राजकारण फिरत आहे. असे असले तरी दिघोळे यांना मानणारा निर्णायक मतप्रवाह आजही गटात टिकून आहे. २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेसमध्ये सरळ लढत होऊन अर्जुन बर्डे यांच्या रूपाने दिघोळे यांच्या राष्ट्रवादी पक्षाने विजय मिळवला होता. गेल्या काही दिवसांत तालुक्याच्या राजकारणात बदल झाल्याने सध्या शिवसेना व भाजपा यांच्यातच सरळ लढत होत असल्याने आगामी निवडणुकीत सेना व भाजपामध्येच सामना रंगण्याचे चित्र असले तरी इच्छुकांची संख्याही विशिष्ट भागातच असल्याने गटाचा समतोल राखत उमेदवारी देण्याचे कसबच कळीचा मुद्दा ठरणार आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे उमेदवारीसाठी मतप्रवाहही बदलत असल्याने सध्या दुरंगी वाटणारी ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आत्ताच नाकारणे धाडसाचे ठरणार आहे. असे झालेच तर गटाची निवडणूक स्त्री प्रधान असली तरी ती अधिकच रंजक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव असल्याने या निवडणुकीला २००७ सालच्या निवडणुकीसारखी महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीला चांगलाच राजकीय रंग चढणार हे नक्की. गेल्या निवडणुकीच्या वेळी या गटात मनसेचा अपवादवगळता कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली असली तरी प्रत्यक्षात ती निवडणूक दिघोळे विरुद्ध कोकाटे अशीच खरी लढत होती. त्यावेळी गटात सेना व भाजपाचा मागमूसही नव्हता. व्यक्तिकेंद्रित राजकारणात बदल होऊन गत पाच वर्षात ज्याप्रमाणे तालुक्याचे राजकारण बदलले तसेच गटातील राजकारणातही मोठे बदल झाल्याने या निवडणुकीत कोणाला विजयी व कोणाला पराभवाला सामोरे जावे लागते हे येणारी निवडणूकच ठरवणार आहे. होणारी निवडणूक जशी उमेदवारांच्या सामाजिक कार्याची पोहच पावती ठरणार आहे. तशीच ती गत पाच वर्षात गटातील गावागावात झालेल्या विकासकामां-बरोबर न झालेल्या कामांची पावतीच ठरणार आहे.