पर्वकाळात रुग्णसेवा देणाऱ्या आयएमए डॉक्टरांचा सत्कार

By Admin | Updated: October 5, 2015 23:25 IST2015-10-05T23:24:23+5:302015-10-05T23:25:27+5:30

मोफत सेवा : रुग्णालय संचालकांचाही गौरव

Felicitated IMA doctors serving in the past | पर्वकाळात रुग्णसेवा देणाऱ्या आयएमए डॉक्टरांचा सत्कार

पर्वकाळात रुग्णसेवा देणाऱ्या आयएमए डॉक्टरांचा सत्कार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील तीनही पर्वणीकाळात रुग्णसेवा देणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या डॉक्टरांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कुंभमेळ्यात आयएमएच्या शंभरहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले दवाखाने ठेवून मोफत रुग्णसेवा पुरविली होती.
शालिमारवरील आयएमएच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड आदि उपस्थित होते. सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा पुरविणे महापालिकेसमोर मोठे आव्हान होते. शासनाकडून देण्यात आलेल्या डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने आणि हृदयरोग, अस्थिरोग, बालरोग व फिजिशियन अशा तज्ज्ञ डॉक्टरांचाही तुटवडा असल्याने प्रशासन चिंतेत होते. परंतु महापालिकेने आयएमएशी संपर्क साधल्यावर त्यांनी शंभरहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली. कुंभपर्वकाळात सर्व डॉक्टरांनी वेळापत्रकानुसार विविध ठिकाणी बारा-बारा तास सेवा देत हजारो रुग्णांवर उपचार केले. त्यांनी दिलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. यावेळी १९ रुग्णालयांनी अत्यावश्यक सेवेसाठी ४५ बॅनर्स नाशिकमध्ये उभारल्याने त्यांच्या संचालकांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉ. मनोज चोपडा, डॉ. पंकज गुप्ता, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद पिंप्रीकर, डॉ. रश्मी चोपडा, डॉ. आनंद तांबट, डॉ. नारायण देवगावकर, डॉ. तुषार देवरे, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. राहुल पाटील, डॉ. राहुल भामरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated IMA doctors serving in the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.