रखडलेल्या निविदांना फुटले आता पाय
By Admin | Updated: July 28, 2016 01:15 IST2016-07-28T01:11:57+5:302016-07-28T01:15:04+5:30
कामांचा निचरा : नूतन आयुक्तांबाबत अपेक्षा उंचावल्या

रखडलेल्या निविदांना फुटले आता पाय
नाशिक : गेल्या दीड वर्षात घंटागाडी,पेस्टकंट्रोलपासून उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीच्या ठेक्यापर्यंत रखडलेल्या आणि अधू झालेल्या निविदांना अखेर पाय फुटले असून त्याची सुरुवात घंटागाडी ठेक्यापासून झाली आहे. नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रलंबित राहिलेल्या एकेक कामांचा निचरा करण्यास प्रारंभ केल्याने त्यांच्याविषयी लोकप्रतिनिधींसह नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
दीड वर्षात डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत अत्यावश्यक प्रकल्प रखडल्याने लोकप्रतिनिधींसह जनमानसात नाराजीचा सूर होता. गेडाम यांच्या कारकिर्दीत घंटागाडीच्या ठेक्याचा प्रश्न चिघळला. अटी-शर्तींमुळे तसेच दहा वर्षांच्या कालावधीसाठी ठेका देण्याचा अट्टहास गेडाम यांनी धरल्याने लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष बघायला मिळाला, याशिवाय न्यायालयीन प्रक्रियेलाही महापालिकेला सामोरे जावे लागले.
गेल्या दोन वर्षांपासून घंटागाड्यांचा ठेका रखडल्याने शहरातील घनकचरा व्यवस्थाही विस्कळीत झाली. नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घंटागाडीच्या ठेक्याचा प्रश्न आठवडाभरात मार्गी लावण्याची ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली होती. त्यानुसार घंटागाडीच्या ठेक्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. याचबरोबर पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन आता पुढे सरसावले असून आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याच्याही प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे. उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीच्या ठेक्याबाबतही प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. ठेक्याबाबत असलेल्या अटी-शर्तींमध्ये शिथिलता आणत त्यादृष्टीने पावले उचलली जात आहे. जाहिरात धोरणाबाबत गेडाम यांच्या कारकिर्दीत नुसतीच चर्चा होत राहिली परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. आता प्रशासनाने होर्डिंग्ज तसेच विद्युत पोलवरील जाहिरातींबाबतही प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले असून त्याबाबतही पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)