विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांच्या चारा, पाणी व निवाऱ्याची सोय

By Admin | Updated: April 13, 2016 00:11 IST2016-04-12T23:47:24+5:302016-04-13T00:11:02+5:30

भूतदया : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम

Feeding of birds, feed and shelter by the students | विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांच्या चारा, पाणी व निवाऱ्याची सोय

विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांच्या चारा, पाणी व निवाऱ्याची सोय

 सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात पक्ष्यांच्या चारा, पाणी आणि निवाऱ्याची सोय केली आहे. तीन वर्षांपासून पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
काही वर्षांपासून राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. परिसरातील पिके नाहीशी झाल्यानंतर पक्ष्यांच्या अन्नपाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागल्याने ते मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. झाडांची पाने गळाल्याने पक्ष्यांच्या निवाराही नष्ट होतो. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाडळी शिवारातील डोंगर परिसर व जंगलातील पक्ष्यांच्या वास्तव्याचा अभ्यास केला. पक्ष्यांची घरटी असलेल्या ठिकाणी रिकाम्या पाण्याच्या बाटल्या वापरुन तयार केलेले शिंकाळे पाण्याने भरुन ठेवण्याचा उपाय विद्यार्थ्यांनी शोधून काढत त्याची नियमीत अंमलबजावणीही सुरू केली. पक्ष्यांच्या अन्नाची सोय व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: कागदी द्रोण तयार केले. त्यात धान्य टाकून पक्ष्यांच्या चाऱ्याचाही प्रश्न मिटवला.
काही ठिकाणी झाडांची पाने गळून गेल्याने पक्ष्यांचे निवारे धोक्यात आल्याचे विद्यार्थ्यांना दिसून आले. त्यावर तोडगा काढत विद्यार्थ्यांनी रिकामी खोके, पुठ्ठे यांचा वापर करून पक्ष्यांसाठी सुंदर घरटी बनवली. पक्ष्यांच्या नष्ट होऊ पाहणाऱ्या निवाऱ्यांजवळ ही घरटी झाडांना टांगली. अल्पावधीतच त्याचाही परिणाम दिसून आला. पक्ष्यांनी कागदी घरट्यांचा आधार घेत स्थलांतर थांबविले आहे. पाडळी विद्यालयाच्या या उपक्रमामुळे परिसरात कावळे, साळुंख्या, टिटव्या, घुबडे, कबुतरे, पारव, पोपट यांचा नेहमीहून
अधिक वावर दिसून येत आहे. पक्ष्यांबरोबरच वानरांचीही पाडळी परिसरात मोठी संख्या असून त्यांच्याही अन्नपाण्याची व्यवस्था विद्यार्थी करत आहेत.
याप्रसंगी बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एस. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, एस. एस. देशमुख, टी. के. रेवगडे, के. डी. गांगुर्डे, सी. बी. शिंदे, राहूल गिते, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Feeding of birds, feed and shelter by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.