भोजनावळी उठताहेत; व्हॉट््स अॅपवर तक्रार करा !
By Admin | Updated: February 18, 2017 23:34 IST2017-02-18T23:34:17+5:302017-02-18T23:34:36+5:30
आदर्श आचारसंहिता : नाव गुप्त ठेवणार

भोजनावळी उठताहेत; व्हॉट््स अॅपवर तक्रार करा !
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी प्रचार आता शिगेला पोहोचला असून, अखेरचे काही तास उरले असून होणाऱ्या घडामोडींवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. कुणी भोजनावळी देत असेल, कुणी वस्तूंचे वाटप करत असेल अथवा कुणी पैसेवाटप, याबाबतची माहिती जागरूक नागरिकांनी आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या व्हॉट््स अॅप नंबरवर पुराव्यानिशी पाठवावी, असे आवाहन आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख सरिता नरके यांनी केले आहे. तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवले जाणार असून, प्राप्त तक्रारींची तातडीने चौकशी केली जाणार असल्याचेही नरके यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी रविवार, दि. १९ फेबु्रवारीला सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहोचला असून, जाहीरसभांबरोबरच चौकसभा, घरोघरी मतदारांच्या भेटीगाठींना जोर आला आहे. अशातच काही उमेदवारांकडून मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रलोभने दाखविली जात असल्याच्या तक्रारी आचारसंहिता कक्षाकडे येत आहेत. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने सोशल मीडियावरूनही जागृत नागरिकांना तक्रारी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना कुठे आचारसंहिता भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या व्हॉट््स अॅप नंबरवर तक्रार करावी. पुरावा म्हणून संबंधिताची २० ते ३० सेकंदांची व्हिडीओ क्लिप पाठवावी. तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. कुठे भोजनावळी उठत असतील तर त्याबाबतचेही पुरावे पाठविण्याचे आवाहन आचारसंहिता कक्षाने केले आहे.