गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा धाक निर्माण व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST2020-12-24T04:15:07+5:302020-12-24T04:15:07+5:30
नाशिक: गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला असला तरी या कायद्याचा धाक निर्माण झाला तरच अपप्रवृत्तींना धाक ...

गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा धाक निर्माण व्हावा
नाशिक: गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला असला तरी या कायद्याचा धाक निर्माण झाला तरच अपप्रवृत्तींना धाक बसू शकेल, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित प्राधिकारी डॉ. रत्ना रावखंडे यांनी केले आहे.
जिल्हा रुग्णालय येथील धन्वंतरी हॉल येथे गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदाविषयक कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे बोलत होत्या. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे,सहाय्यक आरोग्य अधिकारी महानगरपालिका डॉ.अजिता साळुंखे, विशेष सरकारी वकील गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा ॲड. रेश्मा जाधव, कायदेशीर सल्लागार ॲड. सुवर्णा शेपाळ यांच्यासह महिला वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. रावखंडे म्हणाल्या, गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायद्यातील शिक्षेत वाढ होणे गरजेचे आहे. जेणेकरून संबंधित कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होऊन मुलींच्या जन्मदरात वाढ होईल आणि सामाजिक विचारधारा बदलण्यासदेखील मदत होईल. जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी अत्यंत गोपनीयरीत्या करण्यात यावी आणि गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही रावखंडे यांनी दिल्या.
कार्यशाळेत ॲड. रेश्मा जाधव यांनी गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायद्यातील कलम व नियम याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. सोनोग्राफी केंद्राची तपासणी, उल्लंघन व त्रुटी आढळून आल्यास आवश्यक दस्तावेज जप्त व सील करणे यामधील महत्त्वाच्या तरतुदींबाबत मार्गदर्शन केले.
--इन्फो--
सेल्फी खिडकी
गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायद्याची जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या स्टँडिंग सेल्फी खिडकीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.