सिडकोतील युवक दुगारवाडी धबधब्यात बुडाल्याची भीती
By Admin | Updated: July 5, 2015 00:42 IST2015-07-05T00:42:13+5:302015-07-05T00:42:36+5:30
सिडकोतील युवक दुगारवाडी धबधब्यात बुडाल्याची भीती

सिडकोतील युवक दुगारवाडी धबधब्यात बुडाल्याची भीती
नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्यावर शनिवारी (दि़४) मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेलेला व पाण्यात उतरलेला सिडकोतील युवक बेपत्ता झाला आहे़ या युवकाचे नाव पवन नंदकिशोर माहेश्वरी (वय २२) असे असून, तो सिडकोतील सावतानगरमधील रहिवासी आहे़ त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सायंकाळपर्यंत या युवकाचा शोध घेऊनही तो सापडलेला नव्हता़ त्यातच अंधार व जंगल परिसर असल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले असून, उद्या (दि़५) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले जाणार आहे़ त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील सावतानगर येथील पवन माहेश्वर हा युवक त्यांच्या सात मित्रांसमवेत शनिवारी दुपारी दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता़ सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घरी परतण्यापूर्वी या सर्वांनी धबधब्याजवळील पाण्यात अंघोळ करून निघाले असता पवनने आणखीन एक डुबकी मारून येतो असे सांगितले़ यानंतर पाण्यात उतरलेला पवन पुन्हा वर आलाच नाही़ यामुळे घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली़ या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी या युवकाच्या तपासासाठी दुगारवाडीला पोहोचले़ त्यांनी सायंकाळपर्यंत पवनचा शोधही घेतला मात्र तो सापडला नाही़ या घटनेची माहिती मिळताच पवनचे आई-वडील व काही नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले होते़ मात्र गडद अंधार व जंगल परिसर यामुळे पोलिसांना शोधकार्य थांबवावे लागले़ दरम्यान, उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)