बिबट्याच्या हल्ल्यात पितापुत्र जखमी
By Admin | Updated: November 10, 2015 22:29 IST2015-11-10T22:28:15+5:302015-11-10T22:29:17+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात पितापुत्र जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात पितापुत्र जखमी
सुरगाणा : सकाळच्या वेळी
शेतातून घराकडे परतणाऱ्या पिता-पुत्रावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
तालुक्यातील वाघधोंड येथील अशोक मुरलीधर कुडाळी (३२) हे त्यांची दोन्ही मुले धर्मराज (१०) व गजेंद्र (४) यांना त्यांच्या केम पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या शेतातून दुचाकीवरून घरी घेऊन
येत असताना ही घटना घडली. ते सकाळी साडेनऊच्या सुमारास वाघधोंडकडील त्यांच्या घराकडे येत होते.
घराकडे परतत असताना सिंबरे खडकाच्या वळणावर त्यांची दुचाकी आली असता अचानक बांबूच्या जाळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने चालत्या दुचाकीवर अचानक झेप घेऊन अशोक कडाळी व त्यांचा मुलगा धर्मराज याच्या डाव्या हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केले.
या हल्ल्यात सुदैवाने चार वर्षाचा गजेंद्र सुखरूप बचावला. प्रसंगावधान राखून कडाळी यांनी आरडाओरडा करून प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली. जखमी पितापुत्रांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने या संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून, या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजऱ्याची मागणी केली आहे. परंतु वनविभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. तरी संबंधित विभागाने आता तरी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाघधोंड, कुंभीपाडा व परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)