पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले

By Admin | Updated: April 12, 2015 00:35 IST2015-04-12T00:20:11+5:302015-04-12T00:35:02+5:30

शोकसभा : सर्वपक्षीय शोकसभेत स्व. उत्तमराव ढिकलेंना आदरांजली

Fatherhood personality disappeared | पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले

पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले

नाशिक : राजकारण, समाजकारणात अग्रेसर असलेल्या उत्तमराव ढिकले यांना अपवाद वगळता पराभव पत्करावा लागला. त्यांच्यातील नेतृत्वगुण व माणसे हेरण्याची वृत्ती पाहता, अनेकांना घडविण्यात त्यांचा हात होता, असे सर्वांसाठीच पितृतुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आली.
माजी खासदार उत्तमराव ढिकले यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी रावसाहेब थोरात सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार होत्या. यावेळी जवळपास सर्वच वक्त्यांनी स्व. ढिकले यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांच्या विविध क्षेत्रात असलेल्या वावरातील अनुभवही कथन केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी, ढिकले यांच्या प्रत्येक निवडणूक जिंकण्यामागच्या यशाचे गमक उलगडून दाखविले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली नसतानाही ढिकले यांनी स्वत: दूरध्वनी करून सोसायटीच्या ठरावाबाबत विचारणा करून आपल्यातील जागरूकतेचा परिचय करून दिल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांनी स्व. ढिकले यांच्याशी महाविद्यालयीन जगतापासून असलेल्या ओळखीचे अनुभव कथन करून, आपल्या अमृतमहोत्सवी समारंभाच्या दिवशीच जिवलग मित्र गेल्याची भावना बोलून दाखविली. माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी, ढिकले यांच्या कॉँग्रेसमधील सक्रियतेची ओळख करून देताना विधान सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारा नवनिर्माणचा एकमेव आमदार गमावल्याचे सांगितले. माजी आमदार माणिक कोकाटे यांनीही ढिकले यांच्याशी झालेला परिचय व त्यांच्यामुळेच शिवसेनेत आपला झालेला प्रवेश याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला ढिकले यांच्यात असल्यामुळेच त्यांना कोणत्याही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला नाही असे सांगून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझा व त्यांचा पराभव होईल हे त्यांनी अगोदरच हेरले होते म्हणूनच आपण निवडणूक लढविणार नाही असे त्यांनी अगोदरच ठरविले होते, असे सांगितले. बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनीही स्व. ढिकले जसे राजकारणात अग्रेसर होते, तसेच ते निष्णात वकीलही होते. एकदा त्यांनी जिल्हा न्यायालयात दुचाकी लावली असता, त्याला न्यायाधीशांनी हरकत घेऊन दुचाकी काढण्याचे फर्मान सोडले; परंतु ढिकले यांनी त्यांना जुमानले नाही, अशी आठवण सांगितली. यावेळी सहकार, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Fatherhood personality disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.