मुलाचा जीव वाचवताना वडिलांनी गमावले प्राण
By Admin | Updated: June 13, 2017 01:30 IST2017-06-13T01:30:01+5:302017-06-13T01:30:19+5:30
विजेचा धक्का : सिडकोच्या हनुमान चौकातील दुर्दैवी घटना; लोखंडी जिन्यात प्रवाह उतरल्याने मृत्यू

मुलाचा जीव वाचवताना वडिलांनी गमावले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : विजेचा धक्का लागलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़ ११) सायंकाळी सिडकोतील हनुमान चौकात घडली़ अनिल बाबूराव भुजबळ (४९) असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
सिडकोतील हनुमान चौकातील रहिवासी मयत अनिल भुजबळ हे शालेय विद्यार्थी वाहतुकीचे काम करीत.रविवारी सायंकाळपासून सिडको परिसरात पावसाची संततधार सुरू होती़ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अनिल भुजबळ व त्यांचा मुलगा अरिहंत या दोघांनी एकत्र जेवण केले. यानंतर घरासमोरील विद्युत खांबाच्या तारेला अरिहंतने धरले असता त्यास विजेचा झटका बसला़ अनिल भुजबळ यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून अरिहंतला बाजूला ओढले. मात्र विजेचा जोरदार झटका त्यांना बसला व ते लोखंडी जिन्यावर फेकले गेले़
लोखंडी जिन्यातही विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना भाऊ संतोष यांनी बाजूला केले़ या घटनेची माहिती मिळताच परिसरातील बाळासाहेब गिते, रमेश उघडे, रोहन मोरे, दत्ता वाडेकर, रोहित इंगळे यांसह नागरिकांनी भुजबळ यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.