पालखेडला पाण्यासाठी उपोषण

By Admin | Updated: March 1, 2017 00:06 IST2017-03-01T00:06:26+5:302017-03-01T00:06:45+5:30

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत.

Fasting for Palkhed water | पालखेडला पाण्यासाठी उपोषण

पालखेडला पाण्यासाठी उपोषण

येवला : तालुक्यात सोडण्यात आलेले पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात चारी क्र मांक ३६ वरील पाणीवापर संस्था व शेतकरी यांना पाण्याच्या हक्काचा निर्धारित पाणी कोटा मिळावा या मागणीसाठी या क्षेत्रातील १४ पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष आणि शेतकरी मंगळवारी येथील पालखेड उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.  चिचोंडी, बदापूर, पारेगाव, निमगावमढ, नाटेगाव,अंगणगाव, बाभूळगाव या ठिकाणच्या विविध १४ पाणीवापर संस्थांना १० जानेवारीच्या पहिल्या आवर्तनात ६० टक्के पाणी आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आवर्तनात ४० टक्के पाणी देण्याचे पाटबंधारे खात्याचे नियोजन होते. पाणी वापर संस्थांचे चेअरमन भाऊसाहेब कांबरे, श्याम मढवई, ज्ञानेश्वर मढवई, प्रमोद लभडे, बबन मढवई, चंद्रकांत मोरे, यतिन पटेल, किसन मढवई, दिगंबर आव्हाड, विठ्ठल आठशेरे, जनार्दन खिल्लारे, सूर्यकांत दिवटे, अण्णा कोटकर, बद्रीनाथ मढवई यांच्यासह शेतकऱ्यांनी पालखेड मुख्य अभियंता यांना सह्यांचे निवेदन देऊन आपले म्हणणे मांडले होते. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. चारी नंबर ३६ या भागात चारी ओलीदेखील झाली नाही. अशातच पाणी बंद केले. पाणी सोडल्यानंतर पालखेड विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे सदर हक्काचे पाणी तत्काळ मिळावे, अशी जोरदार मागणी उपोषणास बसलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पहिल्या आवर्तनात चिचोंडी परिसरातील या १४ पाणीवापर संस्थांना केवळ ४० ते ४५ टक्के पाणी कोटा मिळाला. आता दुसरे पाणी आवर्तन सुरू होऊन १० ते १२ दिवस झाले. टेलकडून वितरकांना पाणी देण्यात आले. ३६ चारीवरील शेतकऱ्यांना ४० टक्के पाणी कोटा देण्याचे नियोजन असताना अभियंता आणि कर्मचारी यांनी कोटा शिल्लक नसल्याचे कारण सांगत केवळ दोन दिवसात चारी केवळ ओली करीत पाणी बंद केले.   या परिसरातील २,९३६ हेक्टर क्षेत्रावरील पाण्याच्या प्रतीक्षेत असलेली पिके करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. पाणी आवर्तनाच्या आमच्या हक्काचे ४० टक्के पाणी द्यावे, अशी मागणी यापूर्वीच पालखेड अभियंता यांना या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. परंतु पाणी बंद झाल्याने शेतकरी हैराण झाले. आणि त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. शिवसेना नेते संभाजी पवार, शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, कालवा सल्लागार समिती सदस्य सुरेश कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी केली. पालखेड अधिकारी कोणीही उपोषणस्थळी फिरकले नाहीत. शासनाची अकार्यक्षमता अधिकाऱ्यांची उदासीनता, नियोजनाचा अभाव, पाणी वितरण व्यवस्थेत असलेला अपुरा कर्मचारी वर्ग याबाबत तीव्र नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
 

Web Title: Fasting for Palkhed water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.