२०० शेतकऱ्यांचे शेतातच उपोषण
By Admin | Updated: August 25, 2016 23:50 IST2016-08-25T23:50:00+5:302016-08-25T23:50:42+5:30
नुकसानभरपाईची मागणी : १५ दिवसात निर्णयाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

२०० शेतकऱ्यांचे शेतातच उपोषण
पिंपळगाव बसवंत : आधी अस्मानी संकट आणि नंतर सुलतानी संकट पाचविला पुजलेले असताना पॉवरग्रिड कार्पोरेशनच्या आडमुठे धोरणामुळे शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार असून, कंपनी विरोधात सुमारे २०० शेतकऱ्यांनी शिरवाडे वणी येथे शेतातच उपोषण सुरू केले.
पॉवरग्रिड कार्पोरेशन आॅफ इंडियाचे औरंगाबाद - बोईसर ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या वीजवाहिनीची मनोरे उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिकसह निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड, येवला या तालुक्यातून विद्युत मार्ग जात असून, काम सुरू करण्यापूर्वी नुकसानभरपाई देण्याचा दिलेला शब्द न पाळल्याने व अगदीच तुटपुंजी मदत जाहीर केल्याने बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ सुमारे २०० शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे. उपोषणात महिलाही सहभागी झाल्या आहेत.
सदर शेतात सकाळपासूनच तहसीलदार विकास भांबरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व मोठा पोलीस ताफा हजर असून, या पॉवरग्रिड व शासनाचा कृषी विभाग यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने अखेर उपोषण व आत्मदहनाचा मार्ग अवलंबला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विद्युत वाहिनीच्या कामासाठी मनोरे उभे करताना महसूल अधिकाऱ्यांनी द्राक्ष झाडांच्या मालाची किंमत प्रति ७३.८० किलोचा दर ठरवून दिली होती. आता कपात करून तो दर अवघा १२ ते १५ रुपये प्रतिकिलो दराने मूल्यांकन केले. बागासाठी आलेला खर्च तसेच जमिनीचा मोबदला आदि नुकसानभरपाई याचा कुठलाही विषय नाही अथवा नुकसानभरपाई नाही. केवळ दबाव यंत्रणेचा वापर करून मनोऱ्याचे काम करू पहात आहे. या मनोऱ्यासाठी तारा ओढण्यासाठीसुद्धा अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र हे वाहनांसाठी काढावे लागणार आहे. त्यांचा तर कुठलाही हिशेबच नाही. कंपनी व जिल्हा प्रशासन अधिकारी यांची मनमानी व दिलेले आश्वासन न पाळल्याने अखेर बाधित शेतकरी एकवटला गेला असून, या विरोधात आता उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून, या उपोषणात राजेंद्र कावळे, शेख, शिवाजी हांडगे, रामभाऊ जाधव, दत्तात्रय कतोरे, सुनील निफाडे, देवा काजळे, मुरलीधर संधान, रघुनाथ निफाडे, ज्ञानेश्वर गवांदे, नामदेव जाधव, संजय पाटील, राजेंद्र पाटील, प्रभाकर पवार, राहुल पाटील, बाळासाहेब गवांदे आदि शेतकरी व महिला सहभागी झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन देण्यात आले आहे. (वार्ताहर)