जिल्ह्याच्या पूर्वभागात तीव्र पाणीटंचाई
By Admin | Updated: September 4, 2015 22:08 IST2015-09-04T22:07:03+5:302015-09-04T22:08:28+5:30
दुष्काळ : गाव पातळीवर दक्षता समित्या स्थापन करण्याची मागणी; रासपचे निवेदन

जिल्ह्याच्या पूर्वभागात तीव्र पाणीटंचाई
येवला : तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उंदीरवाडी परिसरातील मंडाळकर वस्ती, कारवाडी, उत्तमनगर भागातील पाणीटंचाईसंदर्भात येथील ग्रामस्थांनी टँकर सुरू करण्याचा ठराव तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. या प्रस्तावाची दखल घेत बुधवारी (दि. २) तहसीलदार शरद मंडलिक व गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी वाड्यावस्त्यांवर जाऊन पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी केली.
परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना व हातपंपाला भेटी देऊन या भागात टँकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले. टँकर सुरू झाल्यावर पाण्याचे व्यवस्थित वाटप करून पाणी जपून वापरावे तसेच टँकर आल्यावर लवकर टँकर खाली करून घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.
याप्रसंगी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे सचिन कळमकर, दत्तात्रय सोनवणे, दत्तात्रय चौधरी, उपसरपंच तुकाराम गोराणे, विनोद जेजूरकर, बापू क्षीरसागर, सचिन मंडाळकर यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
दक्षता समित्या स्थापण्याची मागणी
चांदवड : राज्यात सर्वत्र दुष्काळ पडला असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अन्न, चारा, पाणी, रोजगार पुरविण्यासाठी शासन व ग्रामस्थ यांचा दुवा बनून काम करण्यासाठी गावपातळीवर दक्षता समित्या स्थापन कराव्यात, अशी मागणी इंडियन चेंबर आॅफ अॅग्रिकल्चर (आयसीए)च्या बैठकीत करण्यात आली. अध्यक्षस्थानी आयसीएचे अध्यक्ष कृषिभूषण शिवनाथ बोरसे होते.
प्रारंभी कोषाध्यक्ष स्व.दौलतराव कडलग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बाजार समित्यांमधून वसूल करण्यात येणारी बेकायदा आडत, हमाली, तोलाई, वाराई या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला.
जनावरांसाठी चारा डेपोची मागणी
सिन्नर : तालुक्यात सलग पाचव्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
सिन्नर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यातील जनतेची तहान भागविण्यासाठी दररोज सुमारे दोनशे टॅँकरच्या खेपा पुरविल्या जात आहेत. मात्र अनेक गावे व वाड्यावस्त्यांवर दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत टॅँकरची मागणी होताच शासनाने त्वरित टॅँकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रासपाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांदळकर यांनी केली.
सिन्नर तालुक्यात यावर्षी पावसाची सरासरी केवळ ३५ टक्क्यांपर्यंत राहिली आहे. कोणत्याही नदी, नाल्याला पाणी वाहत नसल्याचे चित्र आहे. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे शासनाने चारा डेपो सुरू करण्याची मागणी निवेदनात केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरच्या खेपा वाढविण्यासह नवीन टॅँकर वाढविण्यात यावे, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे, शेतकऱ्यांना वीजबिल व कर्जमाफी करण्यात यावी, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा आदिंसह विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
यावेळी रासपाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांदळकर, तालुकाध्यक्ष नीलेश जगताप, शंकर उबाळे, संदीप बोंबले, दत्तू सैंद, शरद सानप, नामदेव सांगळे, ज्ञानेश्वर सांगळे, सचिन कापडणे, अरुण सोनवणे, योगेश जगताप, खंडू बोडके, संगिता सगर, उज्वला कोरे, ज्योती लहामगे, शरद उबाळे, संजोग नाईक, बाळासाहेब कोऱ्हळकर, श्रीकांत नाईक, उत्तम सैंदर आदिंसह रासपचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
४दुष्काळाबाबत चर्चा झाल्यानंतर त्यात गावपातळीवर सरपंचांनी ग्र्रामसभा बोलावून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार देणे, रेशनमधून २ ते ३ किलो दराने धान्य उपलब्ध करून देणे, गुरांसाठी चारा छावणी, पिण्याचे पाणी, गावपातळीवर सरकारने पुढाकार घेऊन दक्षता समित्या स्थापन करून सरकारकडून या सुविधा मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा, शासनाने रोजगार द्यावा, पिण्यासाठी पाणी, चारा छावणीसाठी ऊस व कडबा कुट्टी यंत्र वगैरे सुविधा द्याव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.