गुरुवारी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाची हजेरी कायम राहिली. त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. शहर व परिसरात सकाळपासून पाऊस कायम असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात २४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. भीज पाऊस असल्याने अनेक जुन्या घरांना गळती लागली तर शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचून खड्डे निर्माण झाले.
चौकट===========
धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम
धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर दिवसभर कायम राहिला. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, धरणांमध्ये ५७ टक्के जलसाठा झाला असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८२ टक्के पाणी साठल्यामुळे व त्र्यंबकेश्वर, अंबोली परिसरात पाऊस सुरू असल्याने धरणाची सुरक्षितता लक्षात घेता रात्रीतून पाणी सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इगतपुरी परिसरातही संततधार सुरू असून दारणा धरण ८१ टक्के भरले आहे.