दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: July 4, 2017 00:04 IST2017-07-04T00:04:29+5:302017-07-04T00:04:46+5:30
दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केल्यावर अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त होणार अशी आशा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा अध्यादेश निघाल्यानंतर शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. याच निराशेतून तालुक्यातील सोनजांब येथील माधव बळवंत जाधव (७२) या कर्जबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली . त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली असा परिवार आहे.
सोनजांब येथील माधव बळवंत जाधव या शेतकऱ्याने २०१० - ११ मध्ये सोसायटीकडून द्राक्षबागेसाठी सुमारे साडेपाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र दरम्यानच्या काळात दुष्काळ, गारपीट, नैसर्गिक आपत्ती यामुळे ते कर्जफेड करू शकले नाहीत. यंदा द्राक्षाचे चांगले पीक आले मात्र द्राक्षाला भाव मिळाला नाही. त्यामुळे ते कर्ज फेडू शकले नाहीत. सोसायटीचा वसुलीसाठी सातत्याने तगादा सुरू होता. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण कर्जमाफ होईल ही आशा होती. मात्र कर्जमाफीचा अध्यादेश निघाल्यावर त्यांची घोर निराशा झाली. जाधव यांचे कर्ज २०१२ पूर्वीचे असल्याने त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नव्हता या निराशेतून माधव जाधव यांनी गुरुवार (दि.२९) सायंकाळी चारच्या दरम्यान द्राक्षबागेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांचेवर उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.