पूरपाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष
By Admin | Updated: August 26, 2016 22:21 IST2016-08-26T22:20:52+5:302016-08-26T22:21:04+5:30
हरणबारी धरण : पिके वाया जाण्याची भीती

पूरपाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष
द्याने : मोसम परिसरात पावसाने उघडीप दिली असली तरी हरणबारी धरणाच्या पूरचारीवरील लोखंडी प्लेट चोरी गेल्याने सतत वाहणाऱ्या पाण्याने पिक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांत व्यक्त केली जात आहे. गेल्या चार ते पाच वर्ष दुष्काळाशी सामना करीत असलेला शेतकरी यंदा पावसाने समाधानी आहे. मात्र हरणबारी धरणाचे पूरपाणी खळखळून वाहत असतानाही पाटबंधारे विभागाच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना पूरपाण्याचा फायदा होत नसल्याने संतप्त प्रतिक्रि या उमटत आहेत.
ब्राह्मणपाडे, उत्राणे हा कालवा नऊ किलोमीटरचा आहे. वीस ते पंचवीस दिवसांपासून मोसम नदीपात्रात पूरपाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र चोरट्यांनी पूरपाणी अडवून ठेवणाऱ्या प्लेट्स चोरून नेल्याने शेतकरी नदीपात्रात जीव धोक्यात घालून तात्पुरत्या स्वरूपात पूरपाणी अडविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही चर्चा निष्फळ ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. उत्राणे येथील आवळाई नाल्यापर्यंत अजूनही पाणी पोहोचले नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. शेतातील पिके वाचविण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)