शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:19+5:302021-07-07T04:17:19+5:30
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील वातावरण, येथे पडणारा पाऊस, थंडी या नैसर्गिक घटकांबरोबरच जवळच असलेले मुंबई विमानतळ, रेल्वे ...

शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहायला हवे
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील वातावरण, येथे पडणारा पाऊस, थंडी या नैसर्गिक घटकांबरोबरच जवळच असलेले मुंबई विमानतळ, रेल्वे स्टेशन यामुळे नाशिकच्या शेती क्षेत्राचा विकास होण्याच्या खूप संधी आहेत. याशिवाय नाशिकचे शेतकरी प्रयोगशील आणि धाडसी निर्णय घेणारे आहेत. यामुळेच आज नाशिकची द्राक्ष जागतिक पातळीवर पोहोचली आहेत. द्राक्ष, डाळिंब, कांदा, टमाटा ही नाशिकची प्रमुख पिकं असून, या पिकांच्या निर्यातीत नाशिक आघाडीवर आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये ५० टक्के वाटा नाशिकचा असल्याने नाशिकच्या शेती क्षेत्राचे भविष्य चांगले आहे. म्हणूनच आगामी पाच-सहा वर्षांत शेती क्षेत्रात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाजही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. पूर्वी तंत्रज्ञान, भांडवल, गुणवत्ता या गोष्टींचा शेती क्षेत्रात अभाव होता. पण हे तीनही घटक आता शेती क्षेत्रात येत आहेत. आता लहान्या शेतकऱ्यांसह सर्वांनीच एकत्र येत आपली तडजोडीची क्षमता वाढविली पाहिजे. यासाठी पीकनिहाय शेतकरी गट तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकरी सहकारी संस्था, बाजार समित्या ही ६०-७०च्या दशकातली गरज होती. काळानुरूप झालेल्या बदलामुळे या संस्था आता कालबाह्य ठरू लागल्या असून, डिजिटलायझेशनमुळे शेतकऱ्यांना अनेक बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा अधिकाधिक वापर करून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.
चौकट-
शेती क्षेत्रात रोजगाराच्या संधी
एखाद्या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करूनही फारशा नोकऱ्या तयार होत नाहीत. त्याउलट शेती क्षेत्रात कमी गुंतवणूक करूनही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात. एकट्या द्राक्ष शेतीतून पाच लाख नोकऱ्या निर्माण होतात आणि द्राक्षबाग उभी करण्यास गुंतवणूक अल्पशी लागते, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
चौकट-
आजकाल शेतीचा राजकारणासाठी वापर होतो. सर्व शेतकरी एकत्र येणे म्हणजे संघटन नव्हे तर पीकनिहाय शेतकरी एकत्र आल्यास त्यांची वेगळी ताकद निर्माण होते. अशा गटांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि प्रस्थापितांना बाजूला सारण्यासाठी शेतकऱ्यांमधून व्यावसायिक नेतृत्व तयार होणे गरजेचे असल्याचे मत विलास शिंदे यांनी व्यक्त केले.