हवामानातील बदलाने शेतकर्यांची धावपळ
By Admin | Updated: May 13, 2014 00:18 IST2014-05-13T00:18:21+5:302014-05-13T00:18:21+5:30
ब्राह्मणगाव : येथे परिसरात सततच्या ढगाळ हवामान व अधूनमधून येणार्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे.

हवामानातील बदलाने शेतकर्यांची धावपळ
ब्राह्मणगाव : येथे परिसरात सततच्या ढगाळ हवामान व अधूनमधून येणार्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट आहे. दिवसा कधी पारा ४० अंशांवर, तर कधी आभाळात ढगांची दाटी त्यामुळे पावसाची धास्ती घेऊन दररोज शेतकर्यांना शेतात धावपळ करावी लागत आहे. सततच्या अवकाळी पावसाने येथे कांदा उत्पादन पूर्णत: घटले असून तो कांदा अगदीच मातीमोल भावाने विकावा लागत आहे. खराब कांद्याच्या भावाप्रमाणेच चांगल्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांत मोठी नाराजी पसरली आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यांत सर्वाधिक अवकाळी पाऊस पडल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले खरे, पण शासनाकडून अद्याप शेतकर्यांना आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी या आर्थिक मदतीची मोठी प्रतीक्षा करत आहेत. याबाबत बागलाणचे तहसीलदार पोतदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जेवढे अनुदान उपलब्ध झाले ते अन्य गावांना वाटप झाले व अजूनही बरीच गावे वंचित असून, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकर्यांचे खातेवर त्वरित वाटप करणार असल्याचे सांगितले. बागलाण, मालेगाव, कळवण येथील सर्व आमदारांनी शासनदरबारी पाठपुरावा करुन शेतकर्यांना त्वरित आर्थिक निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी कांदा उत्पादक करत आहेत.