जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
By Admin | Updated: September 30, 2016 01:35 IST2016-09-30T01:33:41+5:302016-09-30T01:35:34+5:30
समृद्धी महामार्ग : इंचभरही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
पांढुर्ली : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवडे, आगासखिंड व सोनांबे येथे समृद्धी महामार्गाबाबत आयोजित करण्यात आलेल्या
बैठकीत शेतकऱ्यांनी या मार्गाला
तीव्र विरोध करीत, एक इंचही
जमीन देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
शिवडे येथे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता चिंतामण धोत्रे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी शेतकऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. शिवडे येथील मारुती मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी समृद्धी महामार्गाच्या लॅण्ड पुलिंग योजनेची माहिती देण्यास प्रारंभ केल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला.
आम्हाला जमिनीच द्यायच्या नाहीत, त्यामुळे तुम्ही त्याचे फायदे आम्हाला सांगू नका, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आमच्या जमिनी बागायती आहेत. पिढ्यान्पिढ्यांपासून आमची उपजीविका या शेतीवर सुरू आहे. या महामार्गामुळे आम्ही भूमिहीन होऊ, अशी भीती अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
शासनाने सदर महामार्ग रद्द करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली. यापुढे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्यासाठी बैठक घेऊ नये, असेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. आम्हाला कितीही मोबदला दिला तरी आम्ही जमीन देणार नसल्याचे शेतकरी म्हणाले. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर अधिकाऱ्यांना बैठक आटोपती घ्यावी लागली.
शिवडे येथील बैठकीस ज्ञानेश्वर चव्हाणके, अनिल शेळके, शांताराम ढोकणे, कारभारी हारक, भास्कर हारक, रावसाहेब हारक, अरुण हारक, पंडित वाघ, बहिरू वाघ, सुनील चव्हाणके, हरिभाऊ शेळके, लक्ष्मण वाघ, भास्कर वाघ, विलास हारक, तुकाराम हारक, निवृत्ती हारक, रोहिदास वाघ, चंद्रकांत वाघ, कैलास कातकाडे, सुभाष हारक, सुभाष शेळके, रघुनाथ शेळके, राजेंद्र केदार, दत्तू वाजे, तर आगासखिंड येथील बैठकीस नामदेव आरोटे, संजय गोडसे, परशराम गोडसे, अर्जुन तुपे, रावसाहेब बरकले, बळवंत आरोटे, रंगनाथ आरोटे, शांताराम आरोटे, निवृत्ती जाधव, सुभाष सोनवणे, कैलास जाधव, विष्णू बरकले, गेणू जाधव, रतन जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)