भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: April 3, 2017 00:41 IST2017-04-03T00:41:21+5:302017-04-03T00:41:33+5:30
येवला : विक्र मी कांदा उत्पादन व कोसळलेले भाव यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्यासंदर्भात कृषिमंत्र्यांचा दरवाजा ठोठावला आहे.

भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल
येवला : विक्र मी कांदा उत्पादन व कोसळलेले भाव यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दरवाजा ठोठावला आहे. या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी जोरदार मागणी येवला बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी केली आहे.
डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत येवला बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार आवारांवर पोळ (लाल) व रांगडा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. पोषक हवामान असल्याने उन्हाळ कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. कांदा हा नाशवंत व जास्त दिवस न टिकणारा शेतमाल आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. सद्यस्थितीत कांद्याचे बाजारभाव किमान तीनशे रुपये ते कमाल सहाशे रुपये, तर सरासरी पाचशे रुपये प्रतिक्विंटल आहे. सदर बाजारभाव अत्यंत कमी असून, या बाजारभावाने उत्पादन खर्चदेखील भरून निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सध्या कांद्याची निर्यात चांगली सुरू आहे व परदेशात कांद्याला मागणीदेखील चांगली असल्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत कांद्याला मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांना कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च, त्यासाठी सरकारी व सहकारी वित्त संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आदि खर्चसुद्धा भागणार नसल्याने पर्यायाने शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडला आहे. उन्हाळ कांद्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. कांदा निर्यातीवर निर्बंध लादू नये व कांदा निर्यात मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी योजनेस मुदतवाढ देणे गरजेचे आहे. कांदा या शेतमालाच्या उत्पादनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळलेला असून कार्यक्षेत्रात कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, हरियाणा व पश्चिम बंगाल या प्रांतांतदेखील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. उत्पादन वाढले असतानादेखील थोडेसे भाव वाढले की कांद्याची निर्यात बंदी केली जाते. (वार्ताहर)