शेतकरी संतप्त : कांद्याचे भाव कोसळले
By Admin | Updated: March 20, 2015 00:08 IST2015-03-19T22:46:51+5:302015-03-20T00:08:15+5:30
नामपूर उपबाजार आवारात रास्ता रोको आंदोलन

शेतकरी संतप्त : कांद्याचे भाव कोसळले
नामपूर : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात प्रतिक्व्ािंटल सरासरी ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपबाजार आवाराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक रास्ता रोको केला. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोसमात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाल्यामुळे बाजार समितीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी येथील उपबाजार आवारात सुमारे साडेसातशेहून अधिक वाहनांची आवक होती. आवक वाढल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अचानक लिलाव बंद पाडून कांदा मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर जायखेडा येथील पोलीस निरीक्षक आर. एस. सोनजे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संतप्त शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा कांद्याच्या लिलावांना सुरुवात झाली. आंदोलनानंतर कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक के. टी. ठाकरे, पोलीसपाटील बाजीराव सावंत, ग्रामपंचायत सदस्य दीपक सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण अहिरे, सीताराम पवार, प्रदीप अहिरे,
चिमण शेलार, स्नेहराज सावंत, शिवसेनेचे शहरप्रमुख समीर सावंत, दीपक बोरसे, किशोर अहिरे,
अभिमन पगार, मनोहर पाटील,
छोटू सावंत, एकनाथ बोरसे, राजेश पवार, चंद्रशेखर पगार आदिंसह शेकडो कांदा उत्पादक उपस्थित
होते. (वार्ताहर)