तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:21+5:302021-04-23T04:16:21+5:30
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्वभागात दिवसभर उन्हाचा कडाका वाढला असून, दुपारनंतर ढगाळ वातावरण होत असल्याने अचानक जोरदार पाऊस पडतो ...

तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकरी धास्तावला
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्वभागात दिवसभर उन्हाचा कडाका वाढला असून, दुपारनंतर ढगाळ वातावरण होत असल्याने अचानक जोरदार पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावले असून, लवकरात लवकर शेतीची कामे आटोपण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसरीकडे कडक केलेले निर्बंध अशा दुहेरी अडचणीत शेतकरी सापडले असून, उन्हाळी कांदा व वांग्याच्या पिकाने शेतकऱ्यांची आर्थिक गरजा भागविण्यास हातभार लावला आहे. तालुक्याच्या पूर्वभागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या भागात मोठ्या प्रमाणात कांदे काढण्याचे काम सुरू आहे. कांदे साठवण्यासाठी चाळ दुरुस्त करण्याची लगबग सुरू आहे. हिंगणवेढे शिवारात मजुरांची वानवा असल्याने आख्खे कुटुंबच कांदे काढण्यात व्यस्त असलेले दिसते. कांद्याची प्रतवारी करून त्यातील काही चाळीत साठवले जातात, तर काही मार्केटला नेऊन विक्री केले जातात. सद्या आठशे ते अकराशे रुपये क्विंटलला भाव कांद्याला मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
एकलहरे, सामनगाव, कोटमगाव शिवारात वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आढळते. पारंपरिक वांग्यापेक्षा निळसर काळ्या रंगाचे ग्यालन वांगे या भागात लक्ष्यवेधी ठरत आहेत. एकलहरे शिवारात जयंत रामदास पाटील यांनी २० गुंठ्यात ग्यालन जातीच्या निळ्या रंगाच्या वांग्याचे पीक घेतले असून, या परिसरात शेतकऱ्यांसाठी ते आकर्षण ठरत आहे. फेब्रुवारीत या वांग्यांची २० गुंठ्यात दोन हजार रोपांची लागवड केली. या वांग्याला सरासरी २५ ते ३० रुपये किलो दर मिळतो. सद्या ही वांगी नाशिकच्या बाजारात जात असून, खर्च वजा जाता बऱ्यापैकी नफा मिळण्याची अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. सुरुवात झाल्यापासून किमान सहा महिन्यांपर्यंत या वांग्यांचे उत्पादन मिळते. या वांग्याच्या खोडव्यापासूनही पुन्हा उत्पन्न मिळविण्यासाठी योग्य काळजी व निगा राखल्यास जास्त उत्पन्न मिळू शकते.
(फोटो २२ कांदा, वांगे)