शेतकऱ्यांनी केले पेरणी आंदोलन
By Admin | Updated: July 30, 2016 00:12 IST2016-07-30T00:06:43+5:302016-07-30T00:12:05+5:30
गिसाका : पेरणी करुन केली जमीन परतीची मागणी

शेतकऱ्यांनी केले पेरणी आंदोलन
गिसाका : गिसाका स्थापनेसाठी दाभाडीच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या. परिसराचा विकास होऊन युवकांना रोजगार उपलब्ध होईल हा हेतू कारखाना उभारण्यामागे होता. मात्र हा कारखाना आर्मस्ट्रॉँग कंपनीने कवडीमोल भावात विकत घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप महाराष्ट्र सहकार बचाव व गिसाका बचाव समितीने केला. यावेळी शेतकऱ्यांनी गिसाकाच्या जमिनीत पेरणी करून आपल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी आंदोलन केले.
महाराष्ट्र सहकार बचाव समितीचे यशवंत अहिरे, प्रा. के. एन. अहिरे, डॉ. सुगन बरंठ यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात आले. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही आदि घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. शिवाजी महाराज व भाऊसाहेब हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्रा. के. एन. अहिरे म्हणाले की, आर्मस्ट्रॉँग कंपनीने गिरणा कारखान्याची जमीन तारण ठेवून कर्ज काढले. १२ जानेवारी २०१२ रोजी नाशिक जिल्हा सह. बॅँकेकडून ३० कोटींचा बोजा चढवून १५ कोटींचे कर्ज घेतले. त्यानंतर १९ नोव्हेंबर २०१४ रोजी नाशिक मर्चंट्स बॅँकेकडे २५ कोटींचा बोजा चढवून साडेबारा कोटी कर्ज घेतले. त्यामुळे या जमिनीवर साडेसत्तावीस कोटींचा बोजा चढविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे. तरी इडीने त्वरित कार्यवाही करून आर्मस्ट्रॉँग कंपनीकडून घेऊन गिसाका सभासद व शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा, असेही प्रा. अहिरे म्हणाले. सातबारावर पीकपाणी लावण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी यशवंत अहिरे, दशरथ बाबूराव निकम, देवबा निकम, डॉ. सुगन बरंठ, अरुण पाटील, विशाल निकम यांची भाषणे झाली. ही लढाई दीर्घकाळ चालणारी असल्याने सर्वांनी संघटितपणे लढा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी शिवाजी पाटील, उत्तम निकम, उदय हिरे, महेश निकम, पंडित धांडे, बबन कापडणीस, पंडित चव्हाण, सुधाकर निकम, विशाल निकम, दादा पवार, जे. एम. निकम, पुष्पा निकम, दादाजी अहिरे, के. डी. पगारे, सी. बी. शेलार, नानाजी निकम, भगवान अहिरे आदिंसह परिसरातील शेतकरी, सभासद व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)