शेतकरी कर्जमाफी हा संवेदनशील मुद्दा : पवार

By Admin | Updated: April 3, 2017 02:07 IST2017-04-03T02:06:50+5:302017-04-03T02:07:04+5:30

नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी संवेदनशील मुद्दा असून, त्याबाबत जनमत तयार होत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

Farmer's debt waiver is sensitive issue: Pawar | शेतकरी कर्जमाफी हा संवेदनशील मुद्दा : पवार

शेतकरी कर्जमाफी हा संवेदनशील मुद्दा : पवार

 नाशिक : शेतकऱ्यांची कर्जमाफी संवेदनशील मुद्दा असून, त्याबाबत जनमत तयार होत आहे. कर्जमाफीसाठी संघर्ष सुरूच राहणार असून, संघर्ष यात्रेचा समारोप पनवेल येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मुरबाड येथील कार्यकर्ता मेळाव्याहून ते नाशकात दाखल झाले असून, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, शिवसेना आपल्या सोबत आल्यास स्वागतच करू, असेही पवार म्हणाले.
हॉटेल एमराल्ड पार्क येथे रात्री शरद पवार यांचे मुक्कामासाठी आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना पवार म्हणाले, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर लढा सुरूच राहणार आहे. हा संवेदनशील मुद्दा आहे. या मुद्द्यावर जनजागृती करण्याची गरज होती. त्यानुसार ही यात्रा काढण्यात आली. ईव्हीएम मशीनमधील गोंधळाबाबत त्यांनी पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडणे चुकीचे असल्याचे सांगून निवडणुकीत आपला पक्ष प्रभावी ठरू शकला नसल्याचीही कबुली दिली. ईव्हीएम मशीनबाबत तक्रारी आल्या असल्या तरी त्यात तथ्य नसल्याचेही पवार म्हणाले. मात्र मध्य प्रदेश आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी याबाबत आक्षेप नोंदविला असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. प्रारंभी आमदार जयंत जाधव, हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, नाना महाले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजयश्री चुंबळे, सदस्य अमृता पवार, युवक कॉँगे्रसचे आकाश पगार यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: Farmer's debt waiver is sensitive issue: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.