पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त
By Admin | Updated: March 26, 2017 22:24 IST2017-03-26T22:24:04+5:302017-03-26T22:24:26+5:30
पिळकोस : शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी धनादेश स्वरूपात देत असल्याने दिलेले धनादेश हे एक दोन महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात संपडला आहे

पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त
पिळकोस : शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतमालाचे पैसे व्यापारी धनादेश स्वरूपात देत असल्याने दिलेले धनादेश हे एक दोन महिने होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात संपडला आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी चेक पद्धतीला पूर्णत: जेरीस आले आहे. तीन-तीन महिने धनादेश न वटल्याने ते ‘बाउन्स’ होण्याचे प्रकार वाढले आहेत. मंगलाबाई दिलीप शेवाळे यांनी कळवण बाजार समितीत कांदा विक्री केली असता त्यांना व्यापाऱ्यांकडून देण्यात आलेला चेक वटला नाही. तर जिभाऊ कडू काकुळते यांनी चार ट्रॅक्टर कांदा विक्र ी केली असून, दोन महिने होऊनही त्यांची साठ हजार तीनशे पंचावन्न ही रक्कम त्यांच्या बॅँक खात्यात जमा झाली नाही. शेतकऱ्यांना त्याचे कांदा विक्र ी केल्याचे पैसे पदरी पाडण्यासाठी बॅँक व व्यापाऱ्यांच्या आडतीत फेऱ्या मारूनही पैसे मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विक्र ी केलेल्या शेतमालाचे पैसे हे व्यापाऱ्यांकडून आरटीजीएस करून मिळावेत, अशी मागणी होत आहे. बॅँकेत धनादेश जमा करून दोन महिने उलटूनही खात्यात पैसे जमा होत नसल्याने शेतकरी पूर्णत: कोंडीत सापडला आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे. शेतकरी नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्व बाजूंनी कोंडीत सापडला गेला आहे. पिळकोस, खामखेडा, विसापूर, बेज, बगडू, भादवण, बिजोरे, चाचेर यांसह परिसरातील शेतकरी बांधव आपला कांदा, मका, गहू व भुसार माल हा कळवण बाजार समितीत विक्री करत आहे. या बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे रक्कम दिली जाते. यातील बहुतेक शेतकऱ्यांचे धनादेश वटत नसल्याची तक्रार आहे. व्यापाऱ्यांकडून मिळालेले धनादेश बॅँकेत जमा करूनही एक ते दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही धनादेशाची रक्कम खात्यात जमा होत नसून शेतकऱ्यांना बॅँकेच्या खेट्या खाव्या लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, तो आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाचे पैसे देताना व्यापाऱ्यांनी कॅशलेस पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. अन्यथा शेतकऱ्याला शेतमाल विकूनही एक-दोन महिन्यांसाठी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याचे चित्र परिसरात दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. नोटाबंदीमुळे शेतमाल कमी भावात खरेदी करतात. दुसरीकडे शेतकऱ्याला धनादेश देतात यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसे येण्यास एक दोन महिन्यांचा कालावधी जात असल्याने शेतीचे नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पुढील उत्पादनावर याचा परिणाम झालेला दिसून येत असून, सर्व बाजूंनी शेतकऱ्याची कोंडी झालेली आहे. शेतीसाठी औषधे, खते खरेदी करताना शेतकऱ्याला दुकानदारांना आरटीजीएस करून पैसे द्यावे लागत आहे; मात्र बाजार समितीतील व्यापारी शेतकऱ्यांना सरसकट धनादेश देत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे देण्याची आरटीजीएस ही सोपी पद्धत असतानादेखील व्यापारी हे शेतकऱ्यांना धनादेश देत आहेत. एक एप्रिलनंतर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून चेक स्वीकारू नयेत तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या मालाची रक्कम उपलब्ध करून द्यावी.
कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना पाठीशी न घालता शेतकऱ्यांचे पैसे हे व्यापाऱ्यांकडून देण्यासाठी आग्रह करावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा माकपाचे कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, उत्तम मोरे, अशोक जाधव, ललित वाघ, अभिजित वाघ, पंकज जाधव यांसह तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)