धनादेश न वटल्यास संबंधितांवर कठोर कारवाईबाबत कायद्यात सुधारणा होण्याची गरज असून, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कठोर कायदा होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
गेल्या काही वर्षात द्राक्ष उत्पादकांची द्राक्ष व्यापाऱ्यांकडून धनादेश देत द्राक्ष खरेदी करत पुढे पैसे न देत फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
माजी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करत शेतकऱ्यांना पैसे परत मिळवून देण्याची मोहीम पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढे सुरू ठेवली असून, त्यांनी नुकतेच कादवा सहकारी साखर कारखान्यावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांशी हितगुज करत त्यांचे तक्रार अर्ज घेत कारवाई करत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी यावेळी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी काही उपाययोजना सुचवून पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करत शेतकऱ्यांनीही फसवणूक टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची अनेक व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर येत आहे.
२०२०-२१ या वर्षात कोट्यवधींची फसवणूक करून व्यापारी फरार झाले आहेत. खोटे धनादेश देऊन तर काही शेतकऱ्यांशी तोंडी व्यवहार करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून घरातील लग्न समारंभ, उधार उसनवारी, औषधे, खते, कर्ज हे सर्व व्यवहार ठप्प होत आहेत, तसेच पुढील पीक उभे करताना शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी तक्रार अर्ज दिले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक अनंत तारगे, कादवाचे संचालक मधुकर गटकळ, साहेबराव पाटील, बापू पडोळ, सुखदेव जाधव, रामदास पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रघुनाथ पाटील यांनी करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.