लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्णासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. शेतमालाचे बाजारात होणारे नेहमीचे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण या व्यवसायाला खड्ड्यात लोटणारे असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून, शेती व्यवसायात प्रगत मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही शेतकरी आत्महत्येचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेती करण्यापेक्षा येत्या १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीडशे गावे १ जूनपासून संपावर जाणार असून, या संपात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कर्ज काढून पिकविलेल्या शेतीत नुकसानच सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अल्प भांडवलात कुटुंबाच्या गरजेपुरतेच धान्य पिकविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, इगतपुरी, सिन्नर, कळवण, सटाणा, येवला आदी तालुक्यांमधून शेतकऱ्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांनी संपाचा ठराव केला असून, शेतीमध्ये घाम गाळूनही त्याचा मोबदला मिळत नसल्याने १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारून लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील दीडशे गावांतील शेतकरी १ जूनपासून संपावर
By admin | Updated: May 6, 2017 01:17 IST