कुटुंबाकडून लढण्याचे बळ; पक्षश्रेष्ठी म्हणतात, माघारी या
By Admin | Updated: February 8, 2017 01:02 IST2017-02-08T01:02:44+5:302017-02-08T01:02:55+5:30
पूर्व विभाग : उमेदवारांनी ढाळले अश्रू; कुटुंबीयांनी फाडले अर्ज

कुटुंबाकडून लढण्याचे बळ; पक्षश्रेष्ठी म्हणतात, माघारी या
नाशिक : कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका, असे सांगत चक्क शपथ देऊन निवडणूक लढण्याचे बळ कुटुंबाकडून दिले गेले. मात्र पक्षश्रेष्ठींकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या दबाव आणून माघार घ्या, असे सांगण्यात आल्याने पूर्व विभागातील भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेणे पसंत केले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी माघारीसाठी सातत्याने दबाव आणत निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर होण्यास भाग पाडल्याचा आरोप करत प्रभाग १६ अ मधून अपक्ष म्हणून लढणाऱ्या रेखा विकास दाणी यांना निवडणूक कार्यालयाच्या कक्षात अश्रू अनावर झाले. हे बघून विकास दाणी यांनी उमेदवारी अर्ज फाडून नाराजी दर्शविली. भाजपाकडून मुलाखतीत उमेदवारीचा शब्द देण्यात आला. तसेच कार्यालयातून फोनवरून तयारीला लागा, असे वारंवार सांगितले जात होते. मात्र ऐनवेळी तिकीट कापले गेले. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्याचे दाणी यांनी सांगितले. यानंतर भाजपाच्या फरांदे व अन्य पदाधिकाऱ्यांकडून वारंवार माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता म्हणून अखेर माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. रात्री उशिरा दाणी यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे स्वेच्छेने माघार घेत वरिष्ठांचा आदेश पाळला. माझ्यावर कोणीही दबाव टाकला नसल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगून सारवासारव क रण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्नदेखील दबावाखालीच करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणातून स्वत:ला दूर ठेवणे पसंत केले आहे. पाटील यांना भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी प्रभाग २३ ड मधून अपक्ष अर्ज भरला होता.