कांदा भावात घसरण
By Admin | Updated: February 8, 2017 00:21 IST2017-02-08T00:21:27+5:302017-02-08T00:21:39+5:30
येवला : शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

कांदा भावात घसरण
येवला : येथील व अंदरसूल उपबाजार समितीत दररोज ५० ते ६० हजार क्विंटल कांद्याची आवक होत असल्यामुळे भावात सातत्याने घसरण होत आहे. शासन कांद्याबाबत कधी गंभीर होणार, हाच प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. सत्ता मिळाल्यावर उत्तर प्रदेशात कर्जमाफी करू या घोषणेबाबत खिल्ली उडविताना, महाराष्ट्रात सत्ता आहे तेथे अगोदर कर्जमुक्ती आणि कांद्याला भाव द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल कांद्याची आवक दुप्पट झाली होती. दर वर्षी आवक वाढतच आहे. यंदा भाव निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नोटाबंदीमुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. शेतकऱ्यावर बुरे दिन आल्याची प्रतिक्रिया बाजार समितीच्या आवारात सोमवारी व्यक्त झाली. निर्यातदारांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन निर्यात वाढवावी. कांद्याला आलेली अवकळा थांबवावी. महाराष्ट्रासह भारतात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादित होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कांद्याला जोरदार मागणी आहे. कांदा पिकाबाबत निर्यातमुक्त धोरण राबविण्याची गरज आहे. नोटाबंदीचा निर्णयदेखील कांद्याला मारक ठरत आहे. (वार्ताहर )