गिरणारे, गोवर्धन गटात गोेंधळ
By Admin | Updated: February 22, 2017 01:59 IST2017-02-22T01:59:13+5:302017-02-22T01:59:40+5:30
मतदार याद्यात घोळ : नागलवाडीचे मतदान गिरणारेत

गिरणारे, गोवर्धन गटात गोेंधळ
नाशिक : तालुक्यातील चार गट व आठ गणांसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळपासूनच मतदारांनी उत्साह दाखविला. दुपारी साडेतीनपर्यंत तालुक्यातील १३० मतदान केंद्रांवर एकूण एक लाख २९ हजार ४२७ मतदानापैकी ५४ हजार ४३२ मतदारांनी (४२.०६) मतदानाचा हक्क बजावला. गिरणारे गटातील देवरगाव गणातील नागलवाडी या गावचे मतदान चक्क गिरणारे गणात समाविष्ट करण्यात आल्याने अनेक मतदारांचा गोंधळ उडाल्याचा आरोप माजी सभापती दिलीप थेटे यांनी केला, तर गोवर्धन गटातील गणेशगाव (त्र्यं) मधील सुमारे सातशेहून अधिक मतदारांची नावे गायब झाल्याचा आरोप गावातील मतदारांनी केला. सकाळी साडेसात वाजेपासूनच मतदानासाठी ग्रामीण भागात उत्साह होता. चांदशी गावातील १४२८ मतदारांपैकी २४४ मतदान सकाळी ११ वाजेपर्यंत झाले होते. दुगाव येथील २,१९९ मतदानापैकी ४०७ मतदारांनी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २० टक्के मतदारांनी हक्क बजावला होता. गिरणारे गाव हे गिरणारे गटातील मोठ्या मतदारसंख्येचे गाव असून, दुपारी बारा वाजेपर्यंत ५५१६ एकूण मतदानापैकी ७३९ मतदान झाले होते. दुपारपर्यंत धोंडेगावला १३२३ पैकी ३७२, राजेवाडीला ५८५ पैकी २८०, गणेशगावला ७५० पैकी ४०० मतदान झाले. या गावातील कैलास कोरडे, पद्मा कोरडे, बाळू नामोडे, दिनकर कोरडे, विष्णु घोटे, सुखा नामोडे, मंदाबाई कोरडे, राजू कोरडे, विठ्ठल नामोडे, हौशाबाई नामोडे, महादू नामोडे, बाबूराव कोरडे, अनुसया कोरडे, शेवतांबाई कोरडे यांच्यासह शेकडो मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांनी मतदान केंद्रांवर जाऊन शोधाशोध करूनही त्यांच्या पदरी शेवटी निराशा पडली. महिरावणी येथे २,१२७ मतदारांपैकी ९२३ मतदान झाले होते. गावातील भाऊसाहेब खांडबहाले, शंकर खांडबहाले यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदान केंद्रांबाहेर ठाण मांडल्याचे चित्र होते. तळेगावला १,५४९ पैकी ८६७, तर विल्होळीला २,०७० पैकी ९५५ मतदान दुपारी ३ वाजेपर्यंत झाले होते. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मतदार यादीत घोळ झाल्याचा मतदारांचा आरोप होता. (प्रतिनिधी)