चॅलेंजर्सकडून फाल्कन्सचा दारुण पराभव
By Admin | Updated: December 24, 2016 01:50 IST2016-12-24T01:50:11+5:302016-12-24T01:50:29+5:30
लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धा : यासर सामनावीर, प्रशांत नाठेचे वादळी अर्धशतक

चॅलेंजर्सकडून फाल्कन्सचा दारुण पराभव
नशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सीझन-६ मधील चौथ्या सामन्यात शुक्रवारी नाशिक चॅलेंजर्सने संदीप फाल्कन्सचा दारुण पराभव केला. कर्णधार यासर शेखच्या वादळी ४९ धावा व प्रशांत नाठेच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर नाशिक चॅलेंजर्सने १०५ धावांचे लक्ष्य १२ षटकांमध्ये केवळ एक गडी गमावून पार केले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना संदीप फाल्कन्सच्या संघाला १९.४ षटकांमध्ये सर्वबाद १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे नाशिक चॅलेंजर्सच्या संघाने हे आव्हान सहज पार केले.
नाशिक चॅलेंजर्स संघाचा कर्णधार यासर शेखने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवत गौतम सूर्यवंशीने दुसऱ्या षटकातच सलामीवर रंजीत भदरगेला ४ धावांवर प्र्रशांत नाठेकरवी झेलबाद क रून संदीप फाल्कन्सला पहिला धक्का दिला. यावेळी संघाची धावसंध्या केवळ ५ झाली होती. सत्यजित बच्छावने पाचव्या षटकात २३ धावा असताना महेराज सय्यदला तंबूत धाडले. संदीप फाल्कन्सचा संघ सुरुवातीला बसलेल्या या धक्क्यातून अखेरपर्यंत सावरला नाही. कर्णधार मनोज परदेशी सर्वाधिक ४४, तुषार इंद्रीकर १७ व मोहन केसी १० यांच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. मनोजने एकाकी झुंज देत संदीप फाल्कन्सचा डाव सावरल्याने या संघाला विसाव्या षटकापर्यंत १०४ धावांचे आव्हान उभे करता आले. नाशिक चॅलेंजर्सकडून भेदक गोलंदाजीचा मारा करणाऱ्या गौतम सूर्यवंशी, सत्यजित बच्छाव, यासर शेख व विकास वाघमारेने प्रत्येकी २ व विनय भामरेने १ गडी बाद केल्यामुळे संदीप फाल्कनचा संपूर्ण संघ १९.४ षटकांमध्ये अवघ्या १०४ गारद झाला. प्रत्युत्तरादाखल १०५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नाशिक चॅलेंजर्सच्या संघाने हे आव्हान अवघ्या १२ व्या षटकांतच पूर्ण केले. विजयासाठी १ धाव बाकी असताना यासर बाद झाला. तिसऱ्या स्थानावर मैदानात आलेल्या घनशाम देशमुखने प्रतीक भालेरावच्या दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या सेंट झेव्हियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी यासर व प्रशांतच्या धडाकेबाज खेळासह मनोज परदेशीच्या संयमी खेळीचाही आनंद लुटला. (प्रतिनिधी)