बनावट नोटांची बॅग चोरणारे अटकेत
By Admin | Updated: August 22, 2015 23:48 IST2015-08-22T23:47:56+5:302015-08-22T23:48:21+5:30
बनावट नोटांची बॅग चोरणारे अटकेत

बनावट नोटांची बॅग चोरणारे अटकेत
नाशिकरोड : पंजाब पोलिसांनी जप्त केलेली अडीच लाखांची बनावट नोटांची बॅग चोरून नेणाऱ्या चोरट्याला अमरावती पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडण्यात यश मिळविले आहे. चोरट्याकडून १०० रुपयांच्या २२ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
पंजाबच्या बर्नाला पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी बनावट नोटा जप्त केल्या होत्या. २ लाख ५८ हजार ५०० रुपयांच्या या बनावट नोटा तपासण्यासाठी पंजाब पोलीस नाशिकरोडच्या चलार्थ पत्र मुद्रणालयात आले होते. नोटा बनावट असल्याची खात्री करून पंजाब पोलीस त्या नोटांची बॅग घेऊन गेल्या ११ जूनला रात्री रेल्वेस्थानकावरील नवीन पादचारी पुलावरून प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर जात होते. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने सदर बॅग चोरून नेली होती.
या प्रकरणी रेल्वेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भाबल, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार, हवालदार मांगुलाल पाळदे यांनी रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज व त्याद्वारे फोटो काढून संशयितांची माहिती विविध पोलीस ठाण्यांना व चलार्थ पत्र मुद्रणालयाला कळवली होती. दरम्यान, अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी बनावट नोटा बाजारात चालविणाऱ्या अरशिदखॉ रशिदखॉ (३३) रा. अलीमनगर अमरावती यास पकडून काही बनावट नोटा जप्त केल्या. अमरावती कोतवाली पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटा तपासण्यासाठी चलार्थ पत्र मुद्रणालयाशी संपर्क साधला असता रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.