फेरनियोजनाने टळला गोंधळ

By Admin | Updated: September 14, 2015 23:58 IST2015-09-14T23:58:25+5:302015-09-14T23:58:50+5:30

बॅण्ड पथक, ध्वज, वाहनांच्या मार्गात बदल

Failure to avoid turmoil | फेरनियोजनाने टळला गोंधळ

फेरनियोजनाने टळला गोंधळ

त्र्यंबकेश्वर : येथे शाहीस्नानाच्या दुसऱ्या पर्वणीत पहिल्या पर्वणीतील गोंधळ लक्षात घेऊन आखाड्यांबरोबरील सुशोभित ट्रॅक्टर, भव्य ध्वज, बॅण्ड पथक हे कुशावर्तावरून मेनरोडमार्गे मंदिरात न नेता पाटील गल्लीच्या मधल्या मार्गानेच पाठवून देण्यात आल्याने सर्व आखाड्यांचे शाहीस्नान शांततेत व निर्धारित वेळेत पार पडले.
सजवलेले ट्रॅक्टर, बॅण्ड आदि लवाजम्यासह आखाड्यातील साधू-महंत निघाले असले तरी, अर्ध्या रस्त्यात ट्रॅक्टर, बॅण्ड दुसऱ्यामार्गे आणि साधू, संत, महंत देवी-देवतांसह पायी कुशावर्तावर आल्याने प्रत्येक आखाड्यातील अंतर कमी झाले. धक्काबुक्की, ट्रॅक्टरमुळे ट्रॅफिक जाम आदि गोष्टी यंदाच्या पर्वणीत टाळता आल्या. एकेक आखाड्याबरोबर असणाऱ्या अनेक बॅण्ड्सचा आवाज न झाल्याने साधू-महंतांना सोबतच्या भाविकांना, प्रशासनाला, ग्रामस्थांना आणि देशभरातून आलेल्या भाविकांना शाही पर्वणीवर आपले लक्ष चांगल्या प्रकारे केंद्रित करता आले. प्रत्येक आखाड्याचा जथ्था शांततेत पायी येत असल्याने पोलिसांनाही फारसे परिश्रम न घेता ‘होल्ड अ‍ॅण्ड रिलीज’ पद्धतीने त्यांना सोडता आले. प्रशासनाने केलेल्या विनंतीला मान देऊन आखाड्यांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे शाहीस्नान यशस्वी होऊ शकले. तिसऱ्या पर्वणीत आणि भविष्यात होणाऱ्या कुंभमेळ्यांमध्येही हा पॅटर्न राबविण्यास हरकत नाही, असा निष्कर्ष आता काढला जात आहे. या प्रकारामुळे भाविकांचे, प्रसार माध्यमांचे बॅण्ड, डीजे, रथांची संख्या यापेक्षा विविध आखाड्यांचे साधू, महंत, नागा साधू, त्यांच्या देवता, त्यांच्या हातातील शस्त्रास्त्रे आदिंवर अधिक लक्ष केंद्रित होऊ शकले. कुंभमेळ्याकडे गांभीर्याने बघण्याचा हेतूही सफल झाला. आखाड्यांनीही ट्रॅक्टर आणि बॅण्ड पथकांची संख्या कमी केल्याने त्र्यंबकसारख्या छोट्या गावात होणारी वाहतूक कोंडी टळली.

Web Title: Failure to avoid turmoil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.