कारखाना कामगारांना मिळाला भरघोस बोनस
By Admin | Updated: November 7, 2015 22:48 IST2015-11-07T22:47:08+5:302015-11-07T22:48:45+5:30
दिवाळी जोरात : महिंद्रचा सर्वाधिक बोनस

कारखाना कामगारांना मिळाला भरघोस बोनस
सातपूर :आॅटोमोबाइल क्षेत्रावर आर्थिकमंदीचे सावट असतानादेखील बहुतांश लहान-मोठ्या कारखान्यांनी कामगारांना भरघोस बोनस जाहीर केले आहेत. महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनीने सुमारे ३३ हजार ते ७८ हजार रुपयांपर्यंत बोनस दिला आहे.
मागील वर्षभरात वाहन उद्योगांना जागतिक मंदीने ग्रासलेले आहे. अजूनही मंदीचे सावट कायम असतानाही उद्योगांनी कामगारांना बोनस जाहीर केल्याने कामगारांची दिवाळी जोरात होणार आहे. सर्वाधिक बोनस देणाऱ्या महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर सोमवारी बोनस जाहीर झाला. बोनसच्या बोलणीसाठी अंतर्गत कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सरचिटणीस सोपान शहाणे, सचिव परशुराम कानकेकर, सहसचिव लॉरेन्स भंडारे, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील, सदस्य सुनील औसरकर, बी. के. भोई आदि पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ व्यवस्थापनाशी बोनसची यशस्वी बोलणी केली. त्यानुसार कामगारांना कमीतकमी ३३ हजार ५९४ ते जास्तीत जास्त ७८ हजार ५८० रुपये बोनस मिळणार आहे.
त्याच पद्धतीने सीएट कंपनीतील कामगारांनादेखील ३० हजार ते ३७ हजार रुपये बोनस मिळणार आहे. बोनसबाबत युनियनचे अध्यक्ष भिवाजी भावले, तसेच गोकुळ घुगे, प्रमोद बेले, अशोक देसाई, दीपक अनवर, पृथ्वीराज देशमुख, आद्याशंकर यादव आदि पदाधिकाऱ्यांनी बोनसची सकारात्मक बोलणी करून कामगारांना ३० ते ३७ हजार बोनस मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे जयनिक्स कंपनीतील कामगारांना सीटू युनियनने २० ते ३० हजार रुपयांचा बोनस मिळवून दिला आहे. सातपूर, अंबड प्रमाणेच सिन्नर येथील आर. डी. इंजिनिअरिंगने २० टक्के, कॉसमॉस इंडस्ट्रीज ८.३० टक्के अधिक दोन हजार रुपये, गौरव इंडस्ट्रीज ८.३० टक्के अधिक दोन हजार रुपये, श्री इंडस्ट्रीज १३ टक्के, एचएनजी कंपनी १७ हजार रुपये, केशफार्मा २० टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर आठ हजार चारशे, एफडीसी अकरा हजार रुपये, रेन्नु फार्मा २१ टक्के, फुड्स अॅण्ड इन्स ८४०० रुपये , वेलोरा अॅग्रो सोल्युशन १० ते १५ हजार रुपये यांसह अनेक उद्योगातील कामगारांना सीटू युनियनचे डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, आर. एम. पांडे, हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी आदिंनी बोनस मिळवून दिला.