संकटाचा सामना : हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड यशस्वी
By Admin | Updated: April 11, 2015 00:38 IST2015-04-11T00:36:58+5:302015-04-11T00:38:49+5:30
शंभर दिवसात एक लाखाचे उत्पन्न

संकटाचा सामना : हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड यशस्वी
खामखेडा : दोन वर्षापासून कधी गारपिटीने तर कधी अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांनी खामखेडासह परिसराला चांगलाच फटका बसला आहे. तरी या संकटांवर मात करून खामखेडा येथील शेतकरी अशोक अहिरे यांनी हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. बेभरवश्याच्या काकडी पिकातून अवघ्या शंभर दिवसांत चार लाखाचे उत्पादन घेत नैसर्गिक संकटापुढे हार न मानता चांगले उत्पन्न घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
निसर्गाचा लहरीपणा अलीकडे वाढला आहे. तरीही प्राप्त परिस्थितीत आपले कौशल्य पणाला लावून उत्कृष्ट नियोजन करणारे शेतकरी असतात. खामखेडा येथील अशोक अहिरे यांनी आपल्या वीस गुंठे हरितगृहात काकडीचे पीक यशस्वी घेत शंभर दिवसांत चार लाखाचे उत्पादन घेतले आहे.
वीस गुंठ्यात काकडीची लागवड
यावर्षी वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड करण्याचे ठरवले. पाच फुटाच्या अंतरावर चाळीस मीटर लांबीच्या अठ्ठावीस बेड तयार केले. पुणे येथून नेदर्लंड सीड्स कंपनीच्या नऊ रु पये किमतीचे बियाणे घरी तयार करत पंचवीस जानेवारीला या बेडवर दोन बाय दीड फुटावर रोपांची लागवड केली. काकडी पंधरा फुटापर्यंत वाढत असल्याने या वनस्पतीचा वेल त्यांनी हरितगृहवरील लावलेल्या अॅँगलला प्लॅस्टिक दोराच्या साहाय्याने चढवली. काकडीची वेलीची रोजच वाढ होत असल्याने त्यांनी काळजी घेतली. पिकाची चौदा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. ठिबक सिंचनातून पाणी व विद्राव्य खते दिली जातात. त्यामुळे झाडाची वाढ होण्यासाठी, चांगली फळधारणा होण्यासाठी शेणखताबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये दिलीत. लागवड केल्यानंतर पंचेचाळीस दिवसांत पीक निघण्यास सुरवात होते. (वार्ताहर)
काकडीवर येणारे रोग, कीड, डावन्या, भुऱ्या, पांढरी माशी इत्यादी रोगांना बळी पडते; मात्र योग्य वेळी निरीक्षणातून लक्षणे दिसू लागताच फवारणी केल्यास लवकर रोग आटोक्यात येतात. याव्यतिरिक्त या पिकावर फवारणीची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर पिकांच्या तुलनेत काकडीला कीडनाशके व खते कमी लागतात. उत्पादन सुरू झाल्यानंतर जास्तीस जास्त दोन महिने या पिकापासून उत्पादन निघते. अहिरे यांनी पंचावन्न दिवसांत दहा तोडे घेतले असून, एका तोड्यास सुमारे दीड टन अशी वीस गुंठ्यात त्यांना पंधरा टन काकडीचे उत्पादन मिळाले आहे. या पिकामध्ये फळांची तोडणी करणे खूप चिवट काम आहे. पंधरा फुटापर्यंत उंच वाढलेल्या वेलीवरून एकेक फळ काढताना सतत वरच्या दिशेला पाहून शिडी अथवा स्टूलच्या साहाय्याने तोडणी करावी लागते. त्यामुळे ह्या कामासाठी आठ मजूर कायमस्वरूपी लागत असल्याचे असल्याचे अहिरे यांचे चिरंजीव रवींद्र यांनी सांगितले. काकडीस पहिल्यांदा पस्तीस ते चाळीस रु पये बाजारभाव मिळाला आणि दोन महिन्यात सरासरी तीस रुपयांपर्यंत बाजार मिळाला. प्लॅस्टिक पाऊचमध्ये भरणा करत संपूर्ण माल त्यांनी व्यापाऱ्यामार्फत मुंबई येथेच विक्री केला. लागवडीपासून काढणीपर्यंत अहिरे यांना एक लाख रु पये खर्च आला तर खर्च वजा जाता अवघ्या वीस गुंठ्यात शंभर दिवसाच्या पिकातून चार ते साढेचार लाखाचे उत्पादन काढले आहे.