ऑक्सिजनची सुविधा, पण साठवणूक व्यवस्थेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 00:16 IST2021-04-14T23:21:24+5:302021-04-15T00:16:17+5:30
दिंडोरी : तालुक्यातील वणी येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजनने सुविधायुक्त अतिरिक्त नवीन कोविड कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र, कक्षास ऑक्सिजन पुरवठ्यासाठी स्टोरेज सिलिंडर बसवलेला नसल्याने कोविड कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोविड रुग्णांना उपचारासाठी इतरत्र धावाधाव करावी लागत आहे. सध्या ट्रामा केअरमध्ये ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असून, सदर अतिरिक्त केंद्र कार्यन्वित झाल्यास अजून ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.

दिंडोरी तालुक्यात कोविडबाधितांची वाढती संख्या चिंताजनक असून, दिंडोरी तालुक्यात सध्या वणी ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत ऑक्सिजन सुविधायुक्त तीस खाटांचा कोविड कक्ष सुरू करण्यात आला आहे, तर बोपोगाव येथील शासकीय आश्रमशाळेत सर्वसाधारण कोविड कक्ष सुरु आहे. मात्र, तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, हे कोविड कक्ष अपुरे पडत आहेत. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मागील आठवड्यात दिंडोरी-पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा बैठक घेऊन कोविड कक्षातील बेड वाढविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने वणी येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयाच्या जनरल कक्षात नव्याने ऑक्सिजन सुविधायुक्त तीस खाटांचा कोविड कक्ष सुरू करण्याबाबत निर्णय घेत, त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते.
यासाठी कक्षात बेडसह ऑक्सिजन पुरवठा करणारी पाइप लाइन व अन्य पायाभूत व्यवस्था पूर्ण केली आहे. मात्र, ऑक्सिजन साठविण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर टँक बसवण्यात आलेले नसल्याने सदर कोविड कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही. तालुक्यातील कोरोनाबाधितांची रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने, जिल्ह्याच्या ठिकाणी व अन्य खासगी रुग्णालयात धावाधाव करावी लागत आहे.
व्हेंटिलेटर नसल्याने गैरसोय
वणी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा कोविड रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आली आहे. मात्र, येथे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असून, रुग्णांची प्रकृती खालावल्यास रुग्णांना खासगी दवाखान्यात बेड साठी शोधाशोध करावी लागत आहे. वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्याने काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे, तसेच दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असून, येथे सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू करण्याचीही मागणी होत आहे.