कॉन्टॅक्ट लेन्स योग्यप्रकारे न हाताळल्यास डोळ्यांना इजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:18 IST2021-08-28T04:18:36+5:302021-08-28T04:18:36+5:30

नाशिक : कित्येक लोक छान दिसावं म्हणून चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. कॉन्टॅक्ट लेन्सचा पर्याय जरी सोयीस्कर असला तरी ...

Eye injury if contact lenses are not handled properly! | कॉन्टॅक्ट लेन्स योग्यप्रकारे न हाताळल्यास डोळ्यांना इजा !

कॉन्टॅक्ट लेन्स योग्यप्रकारे न हाताळल्यास डोळ्यांना इजा !

नाशिक : कित्येक लोक छान दिसावं म्हणून चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. कॉन्टॅक्ट लेन्सचा पर्याय जरी सोयीस्कर असला तरी त्या लेन्स हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यात जरा जरी निष्काळजीपणा झाला तरी डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.

डोळ्यासारखा नाजूक अवयव ज्याला हृदय, मेंदू यासारखे सुरक्षा कवच नाही, त्याची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे डोळ्यात कोणतीही अनैसर्गिक वस्तू स्पर्श करताना सर्व प्रकारची दक्षता घेणे आवश्यक असते.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार “कॉन्टॅक्ट लेन्सेस कित्येक इन्फेक्शनचे मूळ कारण ठरतात. जरी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे सोयीचे व सोपे असले तरी त्यांच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास किंवा त्यांचा वापर कशाप्रकारे करावा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास, आपल्या डोळ्याला इजा होऊ शकते. शेवटी जंतू तर सगळीकडे असतातच. पण डोळ्यासारख्या नाजूक अवयवाला असे इन्फेक्शन फार महागात पडू शकते. त्यामुळे या कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना काळजी घेणे अत्यावश्यक असते.

रात्री झोपताना आठवणीने आपल्या डोळ्यातील लेन्स योग्य त्या केसमध्ये काढून ठेवा. लेन्स लाऊन झोपल्याने डोळ्यातील ऑक्सिजन पुरवठा कमी होतो व लेन्सवर जे जंतू, बॅक्टरिया असतील ते सरळ आपल्या डोळ्यात शिरतात. लेन्स सुरक्षित व जंतू विरहित ठेवण्याकरिता लेन्स केसच वापरा. ती केस वेळच्यावेळी स्वच्छ करून घेणे आवश्यक असते.

इन्फो

लेन्स वापरणाऱ्यांनी काही गोष्टी टाळाव्यात

डोळ्यात लेन्स असताना अंघोळ करणे, चेहरा धुणे, पोहायला जाणे, पावसात भिजणे टाळा. पाण्यात बॅक्टेरिया असतातच. लेन्सला ते चिकटून राहू शकतात व त्यांच्या संपर्कात आल्याने आपल्या डोळ्यांत इन्फेक्शन होऊ शकते. तसेच लेन्स स्वच्छ करण्यासाठी एकदा वापरलेले सोल्युशन टाकून द्या. पुन्हा वापर करणे टाळा. थोडे पैसे वाचवण्याच्या नादात, २-३ वेळा त्याच सोल्युशनचा उपयोग करणे टाळावे. लेन्स ओरिजनल पॅकिंग मधून काढल्यानंतर जास्तीत जास्त किती दिवस वापरू शकता हे आधी विचारून घ्या. वेळ संपली की त्या लेन्स टाकून द्या आणि नवीन लावा. तसेच महिलांनी लेन्स लावले असताना डोळ्याचा मेकअप करु नये. तसेच मेकअप करत असाल तर मेकअप सेटिंग स्प्रे वापरणे टाळा किंवा वापरताना डोळे नीट बंद करून घ्या. तसेच लेन्स लावले असताना गॅस जवळ, विस्तवाजवळ, डायरेक्ट उन्हात वगैरे जाणे टाळावे. उष्णतेमुळे लेन्स व डोळ्यांना इजा होते.

इन्फो

त्रास होत असल्यास त्वरित सल्ला

लेन्स लावल्यानंतर जर डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यांची आग होणे, लालसर होणे, दुखणे, खाज येणे यापैकी एकही समस्या उद्भवल्यास त्या लेन्स त्वरित डोळ्यातून काढून टाका. सतत याच समस्या होत असतील तर आपल्या डॉक्टरांना दाखवा व सल्ला घ्या.

इन्फो

लेन्स कोणी वापरू नये

ज्यांना डोळ्यांचे इन्फेक्शन लगेच होते, ज्यांना “ड्राय आय” ची समस्या आहे, ज्यांना डोळे लाल होण्याची समस्या आहे, डॉक्टरांनी ज्यांना न वापरण्याचा सल्ला दिला त्यांनी, वेळेच्या अभावी लेन्स हाताळण्याचे, स्वच्छतेचे नियम पाळू न शकणाऱ्या व्यक्तींनी, निष्काळजी व्यक्तींनी लेन्स वापरणे पूर्णपणे टाळावे. या सर्व बाबींची काळजी तंतोतंत घेतल्यास लेन्स सारखा सोयीस्कर पर्याय दुसरा नाही. त्यामुळे ज्यांना चष्मा विसरण्याची सवय असते किंवा डोके जड होण्याचा त्रास असतो, त्यांनी सर्व नियम पाळून लेन्सचा योग्य वापर करावा.

Web Title: Eye injury if contact lenses are not handled properly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.