उन्हाळी सुटीसाठी जादा बसगाड्या
By Admin | Updated: April 3, 2017 01:23 IST2017-04-03T01:22:19+5:302017-04-03T01:23:08+5:30
नाशिक : उन्हाळी सुटीसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक विभागाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले.

उन्हाळी सुटीसाठी जादा बसगाड्या
नाशिक : दहावी, बारावीच्या परीक्षा आटोपल्या असून, माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळांच्या परीक्षा संपल्यादेखील आहेत. त्यामुळे उन्हाळी सुटीसाठी गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक विभागाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती एसटी महामंडळ नाशिक विभागाकडून देण्यात आली. हंगामी भाडेवाढीबद्दल अद्याप कोणतेही संकेत नसल्याने चालू दराप्रमाणेच प्रवाशांना तिकिटासाठी पैसे मोजावे लागणार आहे. यंदा लग्नसराईत एप्रिलमध्ये ४, मेमध्ये १४, जूनमध्ये १५ जुलैमध्ये एकही लग्नतिथी नसल्याने प्रवाशांची त्या दृष्टीनेही प्रवाशांची बससाठी गर्दी वाढणार आहे. उन्हाळी सुटी, पर्यटन, लग्नमौंजी, चैत्र नवरात्र आदि विविध कारणांसाठी नाशिकहून राज्य आणि देशभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ४ ते ११ एप्रिल दरम्यान सप्तशृंग गडावर होणाऱ्या चैत्र नवरात्रासाठी पायथा ते गड दररोज ७५ बसेस, प्रत्येक तालुका ते गड २०० बसेस सोडण्यात येणार आहे. दर दीड तासाला निमाणी ते स्वारगेट सकाळी ६ ते संध्याकाळी या वेळेत बस सोडण्यात येणार आहे. दर तासाला निमाणी ते कसारा, दर अर्ध्या तासाला महामार्ग ते शिर्डी अशाप्रकारे बसेस सोडण्यात येणार आहेत. दर पंधरा मिनिटांनी प्रवाशांच्या संख्येनुसार औरंगाबाद, धुळेसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत. दर मंगळवार, शुक्रवार, रविवारी सप्तशृंग गडासाठी, दर सोमवार व रविवारी त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित बस व्यतिरिक्त १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दररोज नाशिक ते शेगाव, नाशिक ते बुलढाणा या बसेस सोडण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)