अतिरिक्त ६० गावांचे कामकाज बंद
By Admin | Updated: October 22, 2016 23:17 IST2016-10-22T23:17:15+5:302016-10-22T23:17:53+5:30
बागलाण : तलाठी संघटना आक्रमक

अतिरिक्त ६० गावांचे कामकाज बंद
ब्राह्मणगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाकडून आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने बागलाण तालुका तलाठी संघटनेने महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या पालघर येथील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अतिरिक्त कार्यभार असलेले तलाठी कार्यालये सील करून कार्यालयांच्या चाव्या तहसीलदार सैंदाणे यांच्याकडे निवेदनासोबत सुपूर्र्द केल्यात. यामुळे तालुक्यातील १७१ पैकी ६० गावांचे कामकाज ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. शासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी वाढली आहे. तलाठी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव अहिरे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. राज्यातील सर्व तलठ्यांना कामकाजाच्या दृष्टीने पायभूत सुविधा मिळून द्याव्यात. लॅपटॉप, प्रिंटर यासह सर्व अडचणी दूर कराव्यात यासाठी तलठ्यांनी आंदोलन केले होते; मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही.
सद्या तलठ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही. वीजजोडणी नाही. ब्रॉडबॅण्ड जोडणी नाही. लॅपटॉप व इतर साहित्य तलठ्यांनी स्वखर्चाने घेतले आहे. निवेदनावर अध्यक्ष साहेबराव अहिरे, उपाध्यक्ष जे. एस. सोनवणे, सर चिटणीस आर. के. मगर, कार्याध्यक्ष एन. पी. मेधणे, पी. एन. गोसावी, बी. डी. धिवरे, सी. पी. अहिरे, एस. के. खरे, जे. यू. गोसावी, एल. के. धूम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)