खतप्रकल्पासाठी आणखी वाढीव आरक्षण
By Admin | Updated: September 12, 2015 23:16 IST2015-09-12T23:16:00+5:302015-09-12T23:16:37+5:30
विकास आराखडा : पाथर्डीच्या शेतकऱ्यांचा विरोध

खतप्रकल्पासाठी आणखी वाढीव आरक्षण
नाशिक : खतप्रकल्पासाठी यापूर्वी आरक्षित केलेल्या ९७ एकर क्षेत्रापैकी अवघ्या २० एकर क्षेत्रावर खतप्रकल्प कार्यान्वित असून, उर्वरित क्षेत्र वापराविना पडून असतानाही आणखी वाढीव आरक्षण टाकण्यास पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत खासदार हेमंत गोडसे व आमदार सीमा हिरे, आमदार योगेश घोलप यांनी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा करत निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे, पाथर्डी शिवारातील सर्व शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. खतप्रकल्पासाठी यापूर्वी या शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील सुमारे ७० एकर क्षेत्र अजूनही वापराविना पडून आहे. त्यामुळे नव्याने आरक्षण टाकण्याची गरज नाही. आता नव्याने आरक्षण टाकलेले सर्व क्षेत्र हे बागायती असून, शेतीवरच संबंधित जागामालकांची उपजीविका चालते. याच शेतामध्ये गेल्या ५०-६० वर्षांपासून सदर शेतकरी घरे बांधून निवासही करत आहेत. महापालिकेने सन १९९३ च्या विकास आराखड्यात मौजे मखमलाबाद व पिंपळगाव बहुला या ठिकाणी कचरा डेपोसाठी आरक्षण टाकलेले आहे.
भविष्यात सदर जागा महापालिकेला उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर आणखी नव्याने आरक्षण टाकून बेघर करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार योगेश घोलप, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह सेनेचे नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)